वृत्तसंस्था / निंगबो (चीन)
आयएसएसएफच्या येथे मंगळवारपासून सुरू झालेल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत पहिल्या दिवशी भारतीय नेमबाजांनी साफ निराशा केली. 10 मी. एअर पिस्तुल आणि मिश्र सांघिक रायफल नेमबाजीत भारतीय स्पर्धकांना अंतिम फेरी गाठता आली नाही.
या क्रीडा प्रकारात भारताच्या दोन जोड्यांनी आपला सहभाग दर्शविला होता. 10 मी. एअरपिस्तुल मिश्र सांघिक नेमबाजी प्रकारात भारताच्या दोन जोड्यांना अनुक्रमे 11 व्या आणि 13 व्या स्थानावर पात्र फेरीत समाधान मानावे लागले. तर 10 मी. एअर रायफल मिश्र सांघिक नेमबाजी प्रकारात भारताच्या दोन जोड्या अनुक्रमे 14 व्या आणि 34 व्या स्थानावर राहिल्या. सुरभी राव आणि अमित शर्मा या जोडीने 10 मी. एअर पिस्तुल मिश्र सांघिक नेमबाजी प्रकारात पात्र फेरीमध्ये अनुक्रमे 284 आणि 594 शॉट्स नोंदविले. चीनच्या जोडीने 585 शॉट्स नोंदवून सुवर्णपदकाला गवसणी घातली. सुवर्णपदकासाठीच्या लढतीत चीनने झेक प्रजासत्ताकचा 17-5 असा पराभव केला.
या स्पर्धेत सहभागी झालेले भारताची आणखी एक जोडी रिदम सांगवान आणि निशांत रावत यांना 13 व्या स्थानावर समाधान मानावे लागले. या जोडीने सरासरी 571 शॉट्स नोंदविले. रिदमने 299 तर रावतने 282 शॉट्स नोंदविले. 10 मी. एअर रायफल सांघिक नेमबाजी प्रकारात भारताच्या रमिता जिंदाल आणि उमा महेश यांना 628.6 गुणांसह 14 व्या स्थानावर समाधान मानावे लागले. या क्रीडा प्रकारात चीनच्या झिनलु आणि सेंग लिहावो यांनी सुवर्णपदक पटकाविले. भारताच्या दिव्यानेशसिंग पनवार आणि मेघना सजणार यांनाही 34 व्या स्थानावर समाधान मानावे लागले. या स्पर्धेमध्ये भारताचे 24 नेमबाज सहभागी झाले आहेत. आता वैयक्तिक गटात बुधवारी अमित शर्मा, निशांत रावत आणि सम्राट राणा हे पुरूषांच्या 10 मी. एअरपिस्तुल नेमबाजीत आपला सहभाग दर्शवतील. तसेच बुधवारी महिलांच्या 25 मी. वैयक्तिक पिस्तुल नेमबाजी प्रकाराला प्रारंभ होणार असून यामध्ये भारताच्या राही सरनोबत, अभिज्ञा पाटील आणि दिव्या टी.एस. या सहभागी होत आहेत.









