वृत्तसंस्था/ चेंगडू (चीन)
येथे सुरु असलेल्या विश्व क्रीडा स्पर्धेत भारताच्या तिरंदाजपटूंची कामगिरी साफ निराशाजनक झाली असून त्याला ऋषभ यादवचा अपवाद म्हणावा लागेल. शनिवारी या स्पर्धेत भारताचा तिरंदाजपटू ऋषभ यादवने कांस्यपदक मिळविले. भारताच्या तिरंदाजपटूंनी मिश्र सांघिक प्रकारात निराशा केली. या क्रीडा प्रकारात भारतीय तिरंदाजपटूंना पहिल्या फेरीत हार पत्करावी लागली.
या स्पर्धेत सहभागी झालेल्या भारताच्या महिला तिरंदाजपटूंकडून चांगली कामगिरी होऊ शकली नाही. पुरुषांच्या वैयक्तिक कंपाऊंड तिरंदाजी प्रकारात ऋषभ यादवने आपल्याच देशाच्या अभिषेक वर्माचा 149-147 असा पराभव करत कांस्यपदक पटकाविले. उभयतांमधील झालेल्या या लढतीत पहिल्या टप्प्याअखेर पाचवा मानांकित अभिषेक वर्मा केवळ एका गुणाने मागे होता. या क्रीडा प्रकारातील उपांत्य फेरीच्या लढतीत ऋषभ यादवला अमेरिकेच्या कर्टिस ब्रॉडनेक्सकडून 145-147 असा पराभव स्वीकारावा लागला. तसेच नेदरलँड्सच्या स्कोलसेरने अभिषेक वर्माचा उपांत्यफेरीच्या सामन्यात 148-145 असा पराभव केला. महिलांच्या वैयक्तिक कंपाऊंड तिरंदाजी प्रकारात भारताचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीतच समाप्त झाले. कोलंबियाच्या चौथ्या मानांकित अॅलेजेंड्रा युसक्विनोने भारताच्या परणित कौरचा 145-140 तर दुसऱ्या एका लढतीत इस्टोनियाच्या सहाव्या मानांकित लिसेल जेटेमाने भारताच्या मधुरा धामणगावकरचा 149-145 असा पराभव केला.
मिश्र सांघिक कंपाऊंड प्रकारात भारतीय जोडी अभिषेक वर्मा आणि मधुरा यांना पात्र फेरीमध्ये दक्षिण कोरियाच्या जोडीकडून हार पत्करावी लागली. दक्षिण कोरियाच्या युनहो आणि मुन यांनी मधुरा आणि वर्मा यांचा 154-151 असा पराभव केला. डेन्मार्कच्या मथायस फुलेरटोन आणि सोफी मार्केसन यांनी मिश्र सांघिक कंपाऊंड तिरंदाजी प्रकारातील सुवर्णपदक मिळविताना मेक्सिकोचा 156-155 असा पराभव केला.









