वृत्तसंस्था / निंगबो (चीन)
येथे झालेल्या आयएसएसएफ विश्वचषक (रायफल/पिस्तुल) मध्ये भारतीय नेमबाजांची घसरण सुरूच राहिली. बुधवारी चीनच्या वर्चस्वापुढे पुरुषांच्या 10 मी. एकर पिस्तुल प्रकारात सम्राट राणा, अमित शर्मा आणि निशांत रावत या र्घ्कुटाला अंतिम फेरीत स्थान मिळवता आले नाही. 10 वर्षीय माजी ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिपमधील सांघिक स्पर्धांमध्ये सुवर्णपदक विजेता सम्राट हा सर्वोत्तम कामगिरी करणारा भारतीय खेळाडू होता. त्याने पात्रता फेरीत 582 गुणांसह 10 वे स्थान पटकाविले. चीनच्या हू काईने प्राथमिक फेरीत अव्वल स्थान पटकाविले. त्यानंतर त्याने 242.3 गुणांसह सुवर्णपदक जिंकले. चीनच्या यू चांगजीने 241.5 गुणांसह रौप्यपदक जिंकले. अशा प्रकारे चीनने दोन सुवर्ण आणि तेवढेच रौप्यपदकांची संख्या चारवर नेली. दुसरीकडे भारताला अद्याप त्यांचे खाते उघडता आलेले नाही.
मंगळवारी सुरभी रावसह 10 मी. एअर पिस्तुल मिश्र सांघिक स्पर्धेत 11 व्या स्थानावर राहिलेला आणखी एक भारतीय युवा खेळाडू अमित शर्मा 576 गुणांसह 28 व्या स्थानावर राहिला. तर निशांत रावत 568 गुणांसह 42 व्या स्थानावर राहिला. भारताची दिव्या सुब्बाराजूने 25 मी. पिस्तुलच्या प्रिसिजन राऊंडमध्ये चांगली कामगिरी केली आणि 37 नेमबाजांच्या क्षेत्रात 291 गुणांसह सातवे स्थान मिळवले. दिव्याने 97, 94 आणि 100 गुणांसह सातवे स्थान मिळविले आणि गुरूवारी रॅपिड राऊंडमध्ये अंतिम फेरीत स्थान मिळविण्यासाठी ती शर्यतीत असेल. दुसरी भारतीय अभिज्ञा पाटील 19 व्या (288) तर राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक विजेती राही सरनोबत 286 गुणांसह 26 व्या स्थानावर आहे.









