मोठय़ा मुलीला देश सोडण्यापासून रोखले : एक मुलगी इस्रायलमध्ये स्थायिक
सुमारे दोन महिन्यापांसून युक्रेनमध्ये विध्वंस घडवून आणणारे रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन आता स्वतःच्या कुटुंबावरून अस्वस्थ आहेत. त्यांनी स्वतःची मोठी मुलगी डॉ. मारिया वोरन्तसोवाला विदेशात जाण्यापासून रोखले आहे. मारिया विदेशात गेल्यास कधीच रशियात परतणार नसल्याची भीती पुतीन यांना सतावत होती.
पुढील आठडय़ात मारिया स्वतःच्या 37 व्या जन्मदिनाच्या आनंदोत्सवासाठी मित्रदेशातील शहरात जाऊ इच्छित होती. मारियाने स्वतःचा जोडीदार येवगेनी नागोर्नीसोबत रोमँटिक व्हेकेशन प्लॅन आखला होता. मारिया सध्या 33 वर्षीय येवगेनीसोबत नात्यात आहे. परंतु पुतीन यांनी मारियाच्या सुरक्षेचा दाखला देत त्यांच्या विदेशप्रवासाच्या योजनेला नाकारले आहे. तर एका प्रसारमाध्यमानुसार विदेशात गेल्यावर रशियात न परतण्याची योजना मारियाने आखली होती.

पुतीन यांनी 1983 मध्ये फ्लाइट अटेंडेंट ल्यूडमिलासोबत विवाह केला होता. या जोडप्याला दोन मुली आहेत. मोठय़ा मुलीचे नाव डॉ. मारिया वोरन्तसोवा असून छोटय़ा मुलीचे नाव कतरिना तिखोनोवा आहे. 30 वर्षे एकत्र राहिल्यावर पुतीना आणि ल्यूडमिला हे 2013 मध्ये विभक्त झाले. मारियाचा जन्म 1985 मध्ये झाला होता. मारियाने सेंट पीटर्सबर्ग युनिव्हर्सिटीमध्ये जैवशास्त्राचे शिक्षण घेतले, त्यानंतर मॉस्को स्टेट युनिव्हर्सिटीमधून वैद्यकीय पदवी मिळविली होती. मारिया रशियाच्या जेनेटिक रिसर्च प्रोग्रामचे नेतृत्व करते.
सद्यकाळात मारिया क्रेमलिन म्हणजेच रशियाच्या राष्ट्रपती भवनात कार्यरत आहे. परंतु अधिकृतपणे ती रशियाच्या आरोग्य मंत्रालयात नॅशनल मेडिकल रिसर्च सेंटर फॉर एंडोक्रोनोलॉजी डिपार्टमेंटमध्ये प्रमुख संशोधिका आहे. 2008 मध्ये मारियाने नेदरलँड्सचा उद्योजक जोर्रिट जूस्ट फासेनसोबत विवाह केला होता. दोघांना एक मुलगा देखील आहे. जोर्रिटचे वडिल नाटो कर्नल म्हणून कार्यरत होते. मारिया आणि जोर्रिट यांचा अलिकडेच घटस्फोट झाला आहे.
मानसकन्येकडून विरोध
युक्रेनवर हल्ला करून पुतीन जगभरातून होणाऱया टीकेला सामोरे जात आहेत. परंतु आता त्यांचे निकटवर्तीय देखील पुतीन यांच्यावर टीका करू लागले आहेत. पुतीन यांची मानसकन्या केन्सिया सोबचाको हिने त्यांच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले आहेत. पुतीन यांच्यावर नाराज होत 40 वर्षीय केन्सियाने देश सोडला आहे. तिने स्वतःच्या मुलासोबत इस्रायलचे नागरिकत्व स्वीकारले आहे. तिने मॉस्कोमधील स्वतःचे एक घर देखील विकले असून याच किंमत 75 कोटी रुपयांहून अधिक होती. युद्धासाठी पुतीन हेच जबाबदार असल्याचे तिचे म्हणणे आहे.









