राहुल गांधी यांनी जम्मूवर लक्ष केंद्रित करण्याची नॅशलन कॉन्फरन्सची मागणी
वृत्तसंस्था / श्रीनगर
जम्मू-काश्मीरमध्ये 11 वर्षांनंतर प्रथमच विधानसभा निवडणूक होत असताना, नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस यांच्यात कोणी कोठे प्रचार करायचा, यासंबंधी मतभेद निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. या भागात मतदानाचे दोन टप्पे पार झाले आहेत. काँग्रेसच्या नेत्यांनी जम्मू भागातील जागांवर लक्ष केंद्रित करावे. काश्मीर खोरे आमच्यासाठी सोडावे, अशी मागणी नॅशनल कॉन्फरन्सने केली आहे.
दोन दिवसांपूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काश्मीर खोऱ्यात जाहीर सभा घेतली होती. त्यामुळे नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांमध्ये नाराजी पसरली आहे. काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स या पक्षांमध्ये युती झाली असली तरी काँग्रेसचा प्रमुख प्रभाव जम्मू भागातच आहे. तर स्थानिक पक्षांचा प्रभाव खोऱ्यात आहे, अशा वेळी राहुल गांधी दोन्हीकडे कशाला प्रचार करीत आहेत, असा या पक्षाचा प्रश्न आहे.
जम्मूसंबंधी काँग्रेस उदासीन
जम्मू संबंधात काँग्रेसची भूमिका उदासीन असल्याचे पहावयास मिळत आहे. अद्याप या पक्षाने आपल्या या प्रभाव क्षेत्रात प्रचाराला प्रारंभदेखील केलेला नाही. आता मतदानाचे दोन टप्पे पार होत आहेत. केवळ एक टप्पा राहिला आहे. अशा स्थितीत काँग्रेस येथे प्रचार करणार केव्हा, अशी शंका नॅशनल कॉन्फरन्सचे नेते आणि जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी व्यक्त केली आहे.
‘370’ची चिंता ?
काँग्रेसने जम्मू भागातच प्रचार करावा, या नॅशनल कॉन्फरन्सच्या आग्रहामागे घटनेचे निष्प्रभ करण्याचा आलेला अनुच्छेद 370 हे कारण आहे, असे मत काही तज्ञांनी व्यक्त केले. जम्मू विभागात हा मुद्दा सकारात्मकदृष्ट्या निर्णायक ठरू शकतो. कारण या भागातील लोकांचा हा अनुच्छेद निष्प्रभ करण्याच्या निर्णयाला पाठिंबा आहे. तथापि, खोऱ्यातील लोक यासंदर्भात स्पष्ट भूमिका घेत असताना दिसत नाहीत. या भागातील काही समाजघटकांना हा अनुच्छेद पुन्हा हवा आहे. नॅशनल कॉन्फरन्सने हा अनुच्छेद पुन्हा आणू अशी भाषा केली आहे. तथापि, काँग्रेसने तसे कोणतेही आश्वासन अद्यापतरी दिलेले नाही. काँग्रेसच्या निवडणूक जाहीरनाम्यातही असे आश्वासन देण्यात आलेले नाही. कारण, तसे ते दिले असते तर जम्मू भागात काँग्रेसला फटका बसण्याची शक्यता मोठी होती. तथापि, काँग्रेसने तसे आश्वासन न दिल्याने खोऱ्यातील नागरिकांची या पक्षावर नाराजी दिसून येते. याचा परिणाम नॅशनल कॉन्फरन्स या पक्षालाही भोगावा लागू शकतो. हा पेच टाळण्याचा एक उपाय म्हणून काँग्रेसने केवळ जम्मू भागावर लक्ष केंद्रित करावे, अशी स्पष्ट आणि जाहीर सूचना ओमर अब्दुल्ला यांना द्यावी लागली आहे.
केंद्र सरकारवर टीका
जम्मू-काश्मीर निवडणूक प्रक्रियेचे निरीक्षण करण्यासाठी केंद्र सरकारने काही विदेशी तज्ञांना आणि संस्थांना आमंत्रण दिले आहे. मतदान प्रक्रिया तसेच प्रचार प्रक्रिया सुरळीतपणे पार पडत आहे, हे भारत जगाला दर्शवू इच्छितो. कारण पूर्वीच्या निवडणुकांमध्ये अनेक गैरप्रकार झालेले होते. तसेच एखाद्या विशिष्ट पक्षाचा पराभव व्हावा म्हणून मतदानामध्ये गडबड घोटाळाही करण्यात येत होता असा आरोप आहे. यावेळच्या निवडणुकांवर तसा कोणताही आरोप होऊ नये याची दक्षता केंद्र सरकार घेत आहे. तथापि, ओमर अब्दुल्ला यांनी याला जोरदार आक्षेप घेतला असून या निवडणुका हा भारताचा अंतर्गत प्रश्न असल्याने विदेशी लोकांना निरीक्षणासाठी आमंत्रित करण्याची काही आवश्यकता नव्हती, असे त्यांनी स्पष्ट केले. पीडीपी या पक्षाने मात्र असा कोणताही आक्षेप नोंदविलेला नाही. सध्या अनेक देशांमधून प्रतिनिधीमंडळे श्रीनगरमध्ये आलेली आहेत. अनुच्छेद 370 निष्प्रभ करण्याच्या निर्णयामुळे लोक मोकळेपणाने मतदान करत आहेत.









