राम-अयोध्येशी पक्षाची लढाई नसल्याचे कृष्णम यांचे वक्तव्य : गुजरातमधील नेत्याने ठरविला चुकीचा निर्णय : अनेक नेते-कार्यकर्ते नाराज
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
अयोध्येतील भव्य राम मंदिरात रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावरून राजकारण होऊ लागले आहे. देशातील अनेक पक्षांनी या सोहळ्यात भाग न घेण्याचा निर्णय घेतला आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात काँग्रेसचा कुठलाच नेता सहभागी होणार नसल्याची घोषणा करण्यात आली आहे. काँग्रेसच्या या निर्णयावर पक्षाच्याच अनेक नेत्यांनी असहमती दर्शविली आहे. राम हे काही कुठल्याही पक्षाचे नाहीत. आमची लढाई राम किंवा अयोध्येशी नाही तर भाजपसोबत आहेत. काही लोक काँग्रेसला डाव्या विचारसरणीच्या मार्गावर नेत आहेत. काँग्रेस नेतृत्वाने अयोध्येला न जाण्याच्या निर्णयावर पुनर्विचार करावा अशी माझी इच्छा असल्याचे काँग्रेस नेते आचार्य प्रमोद कृष्णम यांनी म्हटले आहे. तर गुजरात काँग्रेसचे माजी अध्यक्ष अर्जुन मोढवाडिया यांनी देखील रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात पक्षाने सहभागी न होण्याचा घेतलेला निर्णय चुकीचा असल्याची भूमिका मांडली आहे. सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, अधीर रंजन चौधरी समवेत काँग्रेसचे सर्व नेते या सोहळ्यात सामील होणार नाहीत. हा भाजप आणि संघाचा कार्यक्रम असल्याचा दावा काँग्रेसकडून करण्यात आला. काँग्रेस, सप, तृणमूल काँग्रेस, माकपने सोहळ्यात भाग घेण्यास नकार दिला आहे.
भाजप-संघाने इव्हेंटचे स्वरुप दिले
राम मंदिराच्या निमंत्रणावरून काँग्रेसने सोशल मीडियावर पत्र शेअर करत यात सोहळ्यात सामील न होण्याचे कारण दिले आहे. धर्म हा वैयक्तिक विषय आहे, परंतु भाजप/संघाने मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याला स्वत:चा इव्हेंट केले असल्याचे या पत्रात नमूद आहे.
सुमारे 25 लाख लोकांचा सहभाग
अयोध्येत उभारण्यात येणाऱ्या राम मंदिरात 22 जानेवारी रोजी दुपारी 12.30 वाजता रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासमवेत 6 हजार दिग्गज सामील होणार आहेत. यात 4 हजार संत आणि सुमारे 2200 अतिथींचा समावेश असेल. यादरम्यान 6 दर्शनांचे शंकराचार्य आणि सुमारे 150 साधू-संत देखील उपस्थित असतील. या सोहळ्यात सुमारे 25 लाख लोक सामील होऊ शकतात.
लालकृष्ण अडवाणी सामील होणार
अयोध्येत 22 जानेवारी रोजी होणाऱ्या रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात भाजपचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी सामील होणार आहेत. विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष आलोक कुमार यांनी याची माहिती दिली आहे. तर प्रकृती अस्वास्थामुळे अडवाणी हे या सोहळ्यात सामील होणार नसल्याचे यापूर्वी सांगण्यात येत होते. आलोक कुमार यांनी 19 डिसेंबर रोजी अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांना प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण दिले होते.