प्रतिनिधी/ बेळगाव
राज्य परिवहन कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत दोन संघटनांत मतभेद निर्माण झाल्याने संपासंदर्भात अनिश्चितेचे सावट दिसून येत आहे. वेतनवाढ, 38 महिन्यांचे थकीत वेतन यासारख्या मागण्यांसाठी एच. व्ही. अनंत सुब्बराव यांच्या नेतृत्वातील राज्य रस्ते परिवहन महामंडळ कामगार संघटनेच्या संयुक्त कृती समितीने 31 डिसेंबरपासून संपावर जाण्याचे जाहीर केले आहे. मात्र, राज्य रस्ते परिवहनच्या चार मंडळांच्या महासंघटनेने संपाला पाठिंबा दिलेला नाही.
संपाला पाठिंबा न देण्याचा निर्णय
राज्य रस्ते परिवहन महामंडळ कामगार संघटनेच्या संयुक्त कृती समितीने संपाबाबत महासंघटनेला माहिती दिलेली नाही. पाठिंबा देण्याची मागणी केलेली नाही. केवळ वेतनवाढीची मागणी पुढे करून संयुक्त कृती समितीने संपावर जाण्याचे जाहीर केले असून हे आमच्या मागणीच्या विरोधात आहे. त्यामुळे संपाला पाठिंबा न देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे राज्य रस्ते परिवहनच्या चार मंडळांच्या महासंघटनेने म्हटले आहे.









