हद्दीचा प्रश्न सोडवून तातडीने नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी
बेळगाव : महानगरपालिका आणि कंग्राळी खुर्द ग्रा. पं. च्या हद्दीच्या वादात अडकलेल्या श्रीराम कॉलनी येथील रहिवाशांना नागरी सुविधांपासून वंचित रहावे लागले आहे. विजेचे खांब, गटारी, रस्ते, पिण्याचे पाण्याची सोय नसल्याने रहिवाशांना अनेक समस्यांना तोंड देण्याची वेळ आली आहे. त्यामुळे येथील हद्दीचा प्रश्न सोडवून तातडीने नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, अशी मागणी रहिवाशांतून केली जात आहे. शाहूनगर नजीकच्या श्रीराम कॉलनीतील मिळकतींची नोंद कंग्राळी खुर्द ग्रा. पं. कडे आहे त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून येथील रहिवासी घरपट्टी ग्रा. पं. ला भरत होते. मात्र सदर हद्द महापालिकेच्या अखत्यारित येते. असे सांगण्यात येत असल्याने गेल्या काही दिवसांपासून कंग्राळी खुर्द ग्रा. पं. कडून घरपट्टी भरून घेण्यास नकार दिला जात आहे. महानगरपालिकेकडून जाऊन विचारपूस केली असता मिळकतींचे दाखले आपल्याकडे उपलब्ध नसल्याचे सांगितले जात आहे. एकंदरीत हद्दीच्या वादात अडकलेल्या श्रीराम कॉलनी येथील रहिवाशांना अनेक समस्यांना तोंड देण्याची वेळ आली आहे.
पावसाळ्यात चिखलातून वाट शोधण्याची वेळ
पक्क रस्ते नसल्याने पावसाळ्यात चिखलातून वाट शोधण्याची वेळ आली आहे. त्याचबरोबर वीज खांब, गटारी आणि पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने येथील रहिवाशांना अनेक समस्या भेडसावत आहेत. याबाबत लोकप्रतिनिधींनादेखील भेटून गाऱ्हाणे मांडण्यात आले. तरी देखील समस्या सोडविण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे तातडीने हद्दीचा प्रश्न सोडवून कॉलनीतील रहिवाशांना नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात अशी मागणी केली जात आहे.









