कडोली-जाफरवाडी परिसरात मातीसह खांब घसरल्याने समस्या : तब्बल 5 तासानंतर वीज सुरळीत
वार्ताहर /कडोली
राष्ट्रीय उद्योग खात्री योजनेतून मार्कंडेय नदीमध्ये गाळ व माती काढण्याचे काम करण्यात आले. त्यामुळे पाणीसाठ्यात वाढ झाली. मात्र ती माती नदीच्या काठावरच टाकण्यात आल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे उद्योग खात्रीचा धंदा आणि शेतकऱ्यांचा झाला वांदा अशी परिस्थिती कडोली परिसरातील जाफरवाडी शेतवडीत झाली. त्यामुळे उद्योग खात्रीच्या कामांबद्दल आता संशय व्यक्त करण्यात येत आहे. जाफरवाडी येथील शेतवडीत उद्योग खात्रीतून मार्कंडेय नदी पात्रातील माती काढण्यात आली. ती माती नदीकाठावरच टाकण्यात आली. त्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली नाही. त्यामुळे ती माती पुन्हा नदीत घसरली. याचबरोबर त्या ठिकाणी असलेला विद्युत पोलही मातीसह घसरला. परिणामी अनेक भागातील वीजपुरवठा खंडित झाला. याचा फटका मात्र मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना बसला आहे. या प्रकारामुळे नाराजी व्यक्त होत आहे.
मोठा अनर्थ टळला
ज्या ठिकाणची माती काढण्यात आली होती. त्याच ठिकाणी पुन्हा ती माती गेली आहे. त्यामुळे उद्योग खात्रीतून काम करून काय साध्य केले असा प्रश्न शेतकरी करू लागला आहे. ज्या ठिकाणी खांब घसरला त्या ठिकाणी कोणीही नसल्याने मोठा अनर्थ टळला. वीजखांब संपूर्ण नदीत घसरल्याने त्याच्या वाहिन्या रस्त्यावर आल्या आहेत.
योग्य नियोजनाअभावी घटना घडण्याचे प्रकार
दरम्यान उद्योग खात्रीतून काम केले असले तरी त्याची योग्य प्रकारे नियोजन करण्यात आले नाही. त्यामुळेच अशा घटना घडत आहेत. मार्कंडेय नदीतील माती काढण्यात आली. मात्र त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावली नाही. पहिल्याच पावसात ती माती पुन्हा नदीत आली आहे. त्यामुळे ते काम करुनही वाया झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. माती घसरुन खांबही कोसळल्याने शेतकऱ्यांची मोठी गैरसोय झाली.
विचारपूर्वक कामे करण्याची मागणी
जाफरवाडी परिसरातील शेतकऱ्यांच्या सदर बाब लक्षात येताच हेस्कॉमच्या कर्मचाऱ्यांना बोलावून खांब बसविण्याचे काम करण्यात आले. सायंकाळपर्यंत हे काम सुरू होते. सायंकाळनंतर वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला. मात्र उद्योग खात्रीच्या कामामुळे शेतकऱ्यांना फटका सहन करावा लागला. यापुढे तरी अधिकाऱ्यांनी कामे करताना विचारपूर्वक करावीत, अशी मागणीही शेतकऱ्यांनी केली आहे.









