व्हीलचेअर उपलब्ध करून देण्याची मागणी
बेळगाव : विविध कामानिमित्त महापालिकेत येणाऱ्या दिव्यांगांची फरफट होताना दिसत आहे. व्हीलचेअरअभावी दिव्यांगांना महापालिकेत प्रवेश करताना कसरत करावी लागत आहे. त्यामुळे दिव्यांगांसाठी व्हीलचेअरची सोय करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे. बेळगाव शहरातील नागरिक विविध कामांसाठी दररोज महापालिकेत ये-जा करतात. जन्म-मृत्यू दाखले, व्यापार परवाना, बांधकाम परवाना, नूतन इमारतींना पीआयडी क्रमांक, त्याचबरोबर इतर कामांसाठी येणाऱ्या लोकांची संख्या लक्षणीय आहे. विविध दाखले मिळविण्यासाठी त्यांना तासन्तास रांगेत ताटकळत थांबावे लागते. या कामांसाठी येणाऱ्या दिव्यांगांची संख्याही अधिक आहे. दिव्यांगांना महापालिकेत प्रवेश करण्यासाठी रॅम्पची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, व्हीलचेअर नसल्याने त्यांना जमिनीवरून रांगत महापालिकेत प्रवेश करावा लागत आहे. त्यामुळे दिव्यांगांची होणारी फरफट थांबवावी व त्यांच्यासाठी व्हीलचेअरची व्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे.









