रत्नागिरी :
शिक्षणाच्या वयात बस अपघातात मणक्याला झालेली गंभीर दुखापत. त्यात कमरेपासून खालील भागाच्या संवेदना गेल्याने चालता येईना. पर्यायाने पूर्ण परावलंबत्व. वयाची ४ वर्ष औषधोपचारात गेल्याने शिक्षणाला विरामच ७ वर्ष बेडवरचे असहाय्य जीवन, त्यानंतर मिळालेल्या व्हीलचेअरने स्वावलंबी होण्याचा आधार मिळाला अन् तो व्हीलचेअरच्या आधाराने आपले आर्थिक स्वावलंबत्वाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी घराबाहेर पडला. हा प्रवास आहे गुहागरच्या चिखलीतील पवन जाधव या तरुणाचा.
पवन विलास जाधव हा ३१ वर्षीय तरुण २०१२ साली बारावीत असताना वयाच्या १८ व्या वर्षी बस अपघातात जबर जखमी झाला. अपघातात त्याच्या मणक्याला दुखापत झाल्याचे निदान झाले. त्याच्यावर उपचार करण्यासाठी पुणे व मुंबईमधील काही प्रसिद्ध दवाखान्यांमध्ये त्याला दाखल करण्यात आले होते, मात्र कमरेपासूनचा खालील भागाच्या पूर्ण संवेदना जाऊन पॅराप्लेजिक झाला होता. यामुळे त्याला बिलकूल हलता येत नसल्याने शिक्षणातही खंड पडला होता.
पवनचे वडील विलास जाधव शेती करतात तर आई वर्षा जाधव गृहीणी आहेत. शारिरीक अपंगत्व आल्याने पवन दिवसभर घरातच बेडवर पडून रहायचा. दरम्यान २०१९ साली चिपळूणला एका शिबिरादरम्यान आरएचपी फाऊंडेशनचे अध्यक्ष सादिक नाकाडे यांच्याशी त्याच्या पालकांची ओळख झाली. यावेळी पवनच्या पालकांनी पवनसाठी त्यांच्याकडे व्हीलचेअरची मागणी केली. त्यानुसार नाकाडे यांनी पवनला संस्थेतर्फे नवीन व्हीलचेअर दिली त्याद्वारे त्याचे जीवन बदलले. रत्नागिरीः पवन जाधव याला यांत्रिक व्हीलचेअर मिळाल्याने त्याच्या व कुटुंबियांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला.
- अन् पवनच्या जीवनाला लाभली ‘गती’
पवनला व्हीलचेअर मिळाल्याने तो बराच स्वावलंबी झाला असला तरी त्याला घराबाहेर जाऊन काही काम करायचे असल्यास तो इतरांवर अवलंबून होता. त्यासाठी इलेक्टिक व्हीलचेअरची गरज जाणवू लागली. त्यानुसार त्यांनी सादिक नाकाडे यांच्याकडे मागणी केली. नाकाडे यांनी इम्पॅक्ट गुरू फाऊंडेशन यांच्या साहाय्याने ‘निओ मोशन ची इलेक्ट्रिक व्हीलचेअर पवन याला देत मुंबईमध्ये झोमॅटो डिलिव्हरीचे कामही त्याला मिळवून देण्यात आले. त्यामुळे पवन आज मुंबईतील दादर या ठिकाणी डिलिव्हरी बॉय म्हणून करत आहे. तो स्वावलंबी बनला आहे. तो करत असलेल्या या कामामुळे त्याला जगण्याची नवी उमेद व कुटुंबियांनाही आधार मिळाला आहे.








