ऑनलाईन टीम / मुंबई :
प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माते टी रामा राव (T RAMA RAO) यांचं आज चेन्नईमध्ये निधन झालं. ते 84 वर्षांचे होते. मागील काही दिवसांपासून आजारी असल्याने त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. अभिनेते अनुपम खेर यांनी ट्विट करून यासंदर्भात माहिती दिली आहे.
अनुपम खेर यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, “अनुभवी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि प्रिय मित्र टी रामा राव यांच्या निधनाबद्दल समजल्यावर खूप दु:ख झालं. मला त्यांच्यासोबत ‘आखरी रास्ता’ आणि ‘संसार’मध्ये काम करण्याचं सौभाग्य लाभलं. या दु:खात मी त्यांच्या कुटुंबीयांसोबत आहे. शांती!”
1950 च्या अखेरीस राव यांनी आपले चुलत भाऊ तातिनेनी प्रकाश राव आणि कोटय्या प्रत्यागत्मा यांच्यासोबत करिअरची सुरुवात केली. 1966 ते 2000 या काळात टी रामाराव यांनी हिंदी आणि तेलुगू चित्रपटांचं दिग्दर्शन केलं. बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन यांचा सुपरहिट चित्रपट ‘अंधा कानून’ आणि हिंदीतील ‘नाचे मयूरी’ हा बायोपिकही राव यांनी केला. अंधा कानून, एक ही भूल, मुझे इंसाफ चाहिए, नाचे मयुरी, हथकडी, दोस्ती दुश्मनी हे त्यांचे हिट ठरलेले हिंदी सिनेमे. तसेच जीवन तरंगल, अनुराग देवता, पचानी कपूरम हे त्यांचे तेलगू सिनेमेही खूप गाजले.









