बॉलिवूडसह भारतीय चित्रपटसृष्टीवर शोककळा
वृत्तसंस्था/ मुंबई
हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ दिग्दर्शक-निर्माते श्याम बेनेगल यांचे सोमवार, 23 डिसेंबर रोजी सायंकाळी निधन झाले. वयाच्या 91 व्या वर्षी मुंबई सेंट्रल येथील वोकार्ट हॉस्पिटलमध्ये त्यांची प्राणज्योत मालवली. गेल्या काही दिवसांपासून ते क्रोनिक किडनीच्या समस्येने ग्रस्त होते. ते या आजाराच्या शेवटच्या टप्प्यात असताना उपचारादरम्यान रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने बॉलिवूडसह भारतीय चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
श्याम बेनेगल वाढत्या वयामुळे दीर्घकाळ आजारी होते. त्यांची मुलगी पिया बेनेगल हिने निधनाची अधिकृत माहिती दिली. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. श्याम बेनेगल यांनी या जगाचा निरोप घेणे ही संपूर्ण उद्योगासाठी मोठी हानी आहे. त्यांनी नुकताच आपला 90 वा वाढदिवस साजरा केला होता. अभिनेत्री शबाना आझमीने आपल्या इंस्टाग्रामवर या पार्टीचे फोटो शेअर केले होते. फोटोमध्ये श्याम बेनेगल, शबाना आणि नसीरुद्दीन शाह हास्यात डुंबलेले दिसून येत होते.
बेनेगल यांनी 50 वर्षांहून अधिक काळ फिल्म इंडस्ट्रीमध्ये दीर्घ प्रवास केला. श्याम बेनेगल यांनी 1974 मध्ये ‘अंकुर’ चित्रपटातून दिग्दर्शनाला सुरुवात केली. हा चित्रपट सामाजिक विषयावर आधारित होता. या चित्रपटाने त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून दिली. त्यांच्या यशस्वी चित्रपटांमध्ये मंथन, जुबैदा, निशांत आणि सरदारी बेगम यांचा समावेश आहे. त्यांनी भारतीय चित्रपट क्षेत्रात आपली प्रतिभा सिद्ध केली आहे. ते आपल्या अपारंपरिक चित्रपटांसाठी प्रसिद्ध होते.
‘पद्म’सह अनेक पुरस्कारांनी गौरवित
श्याम बेनेगल यांना भारत सरकारने 1976 मध्ये पद्मश्री आणि 1991 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते. 2007 मध्ये त्यांना सर्वोत्कृष्ट भारतीय सिनेमासाठी दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. श्याम बेनेगल यांच्या चित्रपटांना सात वेळा सर्वोत्कृष्ट हिंदी फीचर फिल्मचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे, ज्यात अंकुर (1974), निशांत (1975), मंथन (1976), भूमिका (1977), मम्मो (1994), सरदारी बेगम (1996), जुबैदा (2001) यांचा समावेश आहे.









