पुणे / प्रतिनिधी :
‘मानसन्मान’ या आपल्या पहिल्याच चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत सर्वांचे लक्ष वेधून घेणारे दिग्दर्शक प्रवीण कारळे यांचे अल्पशा आजाराने खासगी रुग्णालयात निधन झाले. ते 62 वर्षांचे हेते. त्यांच्यामागे पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे. ज्येष्ठ नाटय़समीक्षक स्वर्गीय राजा कारळे यांचे प्रवीण हे पुत्र होत.
प्रवीण कारळे यांनी जे. जे. कला महाविद्यालयातून छायाचित्रण कलेचा अभ्यास केला होता. नामवंत दिग्दर्शकांकडे दिग्दर्शनाचा अनुभव घेतल्यानंतर त्यांनी काही मालिका दिग्दर्शित केल्या होत्या. ‘मानसन्मान’ या पहिल्याच चित्रपटात त्यांनी शिवाजी साटम, रिमा लागू यांच्यासमवेत काम केले होते. त्यानंतरचे ‘बोकड’, ‘भैरू पैलवान की जय’, ‘दुनिया गेली तेल लावत’, ‘माझी आशिकी’, ‘हा, मी मराठा’, ‘तुझीच रे’ आणि ‘हृदयात समथिंग समथिंग’ असे चित्रपट कारळे यांनी दिग्दर्शित केले होते.. तसेच ‘स्वातंत्र्यवीर’ या वेब मालिकेचे दिग्दर्शनही त्यांनी केले होते.









