वृत्तसंस्था/ चेन्नई
भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक राकेश पाल यांचे हृदयविकाराच्या झटक्मयाने निधन झाले. राकेश पाल यांना दिवसभर अस्वस्थतेच्या तक्रारीनंतर राजीव गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांनी चेन्नईतील इस्पितळात अखेरचा श्वास घेतला. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी चेन्नईतील राजीव गांधी सरकारी रुग्णालयात पोहोचून डीजी राकेश पाल यांना श्र्रद्धांजली वाहिली. राकेश पाल यांची जुलै 2023 मध्ये भारतीय तटरक्षक दलाचे 25 वे महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली.
तटरक्षक दलाचे महासंचालक राकेश पाल यांनी रविवारी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासोबत तटरक्षक दलाच्या एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. याचदरम्यान प्रकृती अस्वस्थ्याच्या तक्रारीवरून त्यांना रविवारी दुपारी 2.30 वाजता रुग्णालयात दाखल करण्यात आले, असे संरक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.









