संकलन 8.36 लाख कोटी रुपयांवर ः अर्थमंत्रालयाची माहिती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आगाऊ कर संकलनात वाढ झाल्यामुळे 17 सप्टेंबरपर्यंत चालू आर्थिक वर्षात एकूण प्रत्यक्ष कर संकलन 30 टक्क्यांनी वाढून 8.36 लाख कोटी रुपये झाले असल्याची माहिती अर्थ मंत्रालयाने दिली आहे.
2022-23 या आर्थिक वर्षात आतापर्यंत (परताव्यासाठी समायोजन करण्यापूर्वी) प्रत्यक्ष करांचे एकूण संकलन 8,36,225 कोटी रुपये आहे, जे मागील आर्थिक वर्षाच्या याच कालावधीसाठी 6,42,287 कोटी रुपयांच्या तुलनेत हे संकलन जवळपास 30 टक्के जादाचे असल्याचे माहिती आहे.
8.36 लाख कोटी रुपयांच्या एकूण संकलनापैकी 4.36 लाख कोटी रुपये कॉर्पोरेट आयकर आणि 3.98 लाख कोटी रुपये वैयक्तिक आयकरमधून आले आहेत, असे आपल्या निवदेनात अर्थमंत्रालयाने सांगितले आहे. यामध्ये सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स समाविष्ट असल्याची माहिती आहे.
चालू आर्थिक वर्षात भरलेल्या आयकर रिटर्नच्या प्रक्रियेच्या गतीमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे. 17 सप्टेंबरपर्यंत जवळपास 93 टक्के रीतसर पडताळणी केलेल्या आयटीआरवर प्रक्रिया करण्यात आली आहे.
17 टक्के अधिकचे संकलन
एप्रिल-सप्टेंबरपर्यंत एकत्रित कर संकलन 17 सप्टेंबरपर्यंत 2,95,308 कोटी रुपये होते, जे एका वर्षापूर्वीच्या याच कालावधीच्या तुलनेत 17 टक्के जास्तीचे असल्याची माहिती आहे.









