भोगावती/प्रतिनिधी
राधानगरी तालुक्यातील गांजा विक्री प्रकरणाचे थेट कनेक्शन कर्नाटक ते पंढरपुरात पोचले असल्याचे उघडकीस आले आहे.या प्रकरणी संगनमताने गांजा विक्री करणाऱ्या दोघा मुख्य सुत्रधारांना ३ किलो ६८७ ग्रँम गांजासह राधानगरी पोलीसांनी सोमवारी पंढरपुरातून अटक केली आहे.त्यामुळे तालुक्यासह कर्नाटकातीलही गांजा विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.
राधानगरीच्या पो.नि.स्वाती गायकवाड यांच्या पथकाने मालवे ता राधानगरी गावाजवळ गांजा विक्री करणाऱ्या टोळक्यांवर छापा टाकला होता.त्यावेळी पोलिसांनी गांजासह मोबाईल,मोटरसायकली जप्त केल्या होत्या.त्यानंतर राधानगरी पोलिसांनी तपासात गती घेतली होती.त्यामध्ये हे गांजा विक्री प्रकरणाचे कनेक्शन कर्नाटकांत पोचल्याचे निदर्शनास आले.त्यानंतर अधिक गतीमान तपासात हे कनेक्शन पंढरपुरातही असल्याचे स्पष्ट झाले.
याप्रकरणी वैभव मच्छिंद्र चव्हाण (वय २७ रा.बावडा ता.इंदापुर सध्या रा.पंढरपुर) व प्रवीण नामदेव चव्हाण (वय ३६ रा.सरवडे सध्या निपानी) यांना राधानगरी पोलिसांनी अटक केली.प्रवीण चव्हाण हा वैभव चव्हाण याच्याकडून गांजा घेऊन राधानगरी तालुक्यामध्ये विक्री करीत असल्याचे तपासात स्पष्ट झाले होते. राधानगरी पोलीसांनी या दोघांना ३ किलो ६८७ गँँम गांजासह अटक केली आहे.त्यांना न्यायालयामध्ये हजर केले असता दोघांनाही २ जुनपर्यत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
असा झाला गांजा विक्रीचा तपास ………!
मालवे येथे गांजासह आरोपी सापडल्यानंतर संशयीतांनी नावे कर्नाटकापर्यंत पोचली.तेवढ्यावरच न थांबता गांजाची पाळेमुळे खणून राधानगरी पोलिसांनी थेट पंढरपूर गाठले. त्यामुळे आतापर्यंत गांजा विक्री कारवाईत गांजा पुरविणाऱ्या मुख्य सुत्रधारापर्यंत पहिल्यांदाच केवळ राधानगरी पोचले व दोन मुख्य सुत्रधार सापडले.
या कारवाईत राधानगरीच्या पो.नि.स्वाती गायकवाड यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक विजय घाडगे,पोलीस नाईक कृष्णात यादव, पोलीस कर्मचारी बजरंग पाटील,के डी पाटील यांनी भाग घेतला.