अधिक उष्ण किंवा थंड तापमान वाढविते द्वेष, 12-21 अंश तापमानात राहतो चांगला मूड
तापमानाचा थेट संबंध तुमचा मेंदू आणि वर्तनाशी आहे. अधिक उष्णता आणि थंड तापमान दोन्ही गोष्टी तुम्हाला संताप आणि द्वेषाने भरून सोडतात. 12-21 अंश तापमानात आपण सर्वात चांगल्या मूडमध्ये असतो आणि त्यासमयी संताप देखील कमी प्रमाणात येतो. द लॅन्सेटर प्लेनेटरी हेल्थने अमेरिकेच्या 773 शहरांमध्ये राहणाऱया लोकांच्या वर्तनावर तापमानाच्या हिशेबाने अध्ययन केले आहे. यातून अधिक उष्णता आणि अधिक थंडी असल्यास माणसांमध्ये संताप वाढतो आणि भौतिक स्वरुपात संताप किंवा द्वेष दाखवून न देता आल्यास तो ऑनलाइन व्यक्त होत असल्याचे आढळून आले आहे.

हवामानातील बदल
अमेरिकेत उष्णलाटेदरम्यान ऑनलाइन हेटस्पीच किंवा द्वेषपूर्ण मजकुराच्या घटना मोठय़ा संख्येत वाढल्याचे अहवालात म्हटले गेले आहे. अमेरिकेत 25 टक्के कृष्णवर्णीय आणि 10 टक्के हिस्पॅनिक लोक ऑनलाइन हेटस्पीचला सर्वाधिक बळी पडतात. हवामाना बदलामुळे एलजीबीटीक्यू समुदायाचे लोक 4 पट अधिक प्रमाणात हेटस्पीचचे शिकार ठरल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे.
हेट स्पीचचे कोटय़वधी ट्विट्स
द लॅन्सेट प्लेनेटरी हेल्थच्या टीमने पोट्सडॅम इन्स्टीटय़ूट फॉर क्लायमेट इम्पॅक्ट रिसर्चचे लियोनी वेंज यांच्या नेतृत्वाखाली मे 2014 पासून मे 2020 पर्यंत 6 वर्षांमध्ये अमेरिकेत करण्यात आलेल्या 400 कोटी ट्विट्सची पडताळणी केली. याकरता त्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजेन्सने एलगोरिदम तयार केले, जे हेटस्पीचचा प्रकार ओळखणारे होते. यात 7 कोटी 50 लाख ट्विट हेटस्पीचचे होते. कुठला ट्विट कुठल्या भागातून करण्यात आला आणि तेथे त्या दिवशी तापमान कशाप्रकारचे हेते हे देखील टीमने तपासून पाहिले आहे. उणे 3 ते उणे 5 अंश तापमाना असलेल्या ठिकाणी लोकांनी इतरांपेक्षा 12.5 टक्क्यांनी हेटस्पीच युक्त ट्विट्स केले आहेत.

वाळवंटी भागांमधील प्रकार
वाळवंटयुक्त भागांमध्ये तापमान 42-45 अंश सेल्सिअसदरम्यान होते. तेथे हेटस्पीचयुक्त ट्विट्समध्ये 22 टक्क्यांची वाढ झाली आहे. अधिक उत्पन्न असणारे लोक जे वातानुकुलित यंत्रणांचा वापर करतात, त्यांच्यातही तापमान वाढल्यावर हेटस्पीचयुक्त ट्विट्सचे प्रमाण अधिक दिसून आले आहे. हवामानासोबत जुळवून घेणे यातून सोपे नसल्याचे स्पष्ट होते असे उद्गार अध्ययनात सहभागी आंद्रेस लीव्हरमॅन यांनी काढले आहेत.









