तिऊपती एक्स्प्रेस धावणार बेळगावपर्यंतच : 5 बसने प्रवासी कोल्हापूर, मिरजला रवाना
बेळगाव : तिरुपती-कोल्हापूर एक्स्प्रेस बेळगावपर्यंत धावत असल्याने मिरज, कोल्हापूरला जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होऊ लागली आहे. त्यामुळे नैर्त्रुत्य रेल्वे व परिवहन मंडळाच्या सहकार्याने बेळगाव रेल्वेस्थानकातून कोल्हापूर, मिरजेला थेट बससेवा सोमवारपासून सुरू करण्यात आली. यामुळे प्रवाशांना कोल्हापूर गाठणे सोयीचे ठरले. शेडबाळ ते मिरज रेल्वेस्थानकांदरम्यान रेल्वेमार्गाच्या दुरुस्तीचे काम करण्यात येत असल्याने रेल्वेच्या मार्गात, तसेच वेळापत्रकात जानेवारी अखेरपर्यंत बदल करण्यात आला आहे. काही एक्स्प्रेस शेडबाळपर्यंत धावणार आहेत, तर काही बेळगावपर्यंत धावतील.
तिरुपती-कोल्हापूर एक्स्प्रेस बेळगावपर्यंत धावत असल्याने याचा फायदा खासगी बसचालक उचलत आहेत. अव्वाच्या सव्वा तिकीट दर आकारून कोल्हापूरपर्यंत प्रवाशांना घेऊन जात आहेत. हे प्रकार थांबविण्यासाठी परिवहन मंडळाने प्रवाशांच्या सोयीसाठी बससेवेची व्यवस्था केली. सोमवारी 5 बस रेल्वेस्थानकासमोर थांबविण्यात आल्या होत्या. यामधून प्रवाशांना कोल्हापूर, मिरज, सांगलीपर्यंतचा प्रवास करणे सोयीचे झाले. रेल्वेमार्गाचे दुपदरीकरण व विद्युतीकरणासाठी काही एक्स्प्रेस रद्द तर काहींच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. बेळगाव-मिरज मार्गावर रेल्वे कमी असल्याने मिरज येथे उपचारासाठी जाणारे प्रवासी व त्यांच्या नातेवाईकांना सर्वाधिक फटका बसत आहे. त्याचबरोबर गोकाक, घटप्रभा, कुडची, रायबाग येथून बेळगावमध्ये शिक्षण-नोकरीसाठी येणाऱ्यांनाही तासन्तास थांबावे लागत आहे. त्यामुळे लवकर काम पूर्ण करून रेल्वेसेवा सुरळीत करण्याची मागणी करण्यात येत आहे.









