कोल्हापूर :
महामार्गसह अन्य मार्गावर सतत कचऱ्याचे ढिग साचलेले असतात. यामुळे आरोग्याचे प्रश्न निर्माण होत आहे. रस्त्यावर वारंवार कचरा पडणारे महत्वाचे 46 स्पॉट निश्चित केले आहेत. या ठिकाणी पुन्हा कचरा पडल्यास थेट ग्रामपंचायतींवर कारवाई केली जाईल, असे सक्त आदेश जिल्हाधिकारी अमोल येडगे दिले आहे.
शहरासह ग्रामीण भागातील कचऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. कोल्हापूर शहराच्या हद्दीलगत गावांमधील कचऱ्याचे ढिग साचलेले असतात. हीच स्थिती राज्य महामार्गावरही दिसून येत आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहेच शिवाय स्वच्छतेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. ही बाब जिल्हा प्रशासनाने गांभिर्याने घेतली आहे. करवीर तालुक्यातील 14, हातकंणगले तालुक्यातील 4 ग्रामपंचायतीमधील सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, तलाठी, प्रांताधिकारी, बीडीओ यांची जिल्हाधिकारी कार्यालयातील नूतन हॉलमध्ये जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी बैठक झाली.
करवीर, हातकंणगले येथील राज्य महामार्गासह अन्य मार्गावर 46 स्पॉट असे आहेत की येथे वारंवार कचरा पडलेला असतो. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी या बैठकीत सरपंच आणि ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना 46 स्पॉटच्या ठिकाणी कचरा पडणार नाही, याचे नियोजन करण्याच्या सक्त सूचना दिल्या. ज्या ठिकाणी वारंवार कचरा पडतो. तेथे पर्यायी जागा द्यावी. कचरा संकलन करून त्या जागेवर कचरा टाकण्याची सोय करावी. मात्र, 46 स्पॉटवर पुन्हा कचरा दिसता कामा नये. येथून पुढे या स्पॉटवर कचरा दिसल्यास संबंधित ग्रामपंचायतीवर नाईलाजाने कठोर कारवाई करावी लागेल, असे सक्त आदेश जिल्हाधिकारी येडगे आणि जिल्हा परिषदेचे कर्तिकेयन एस यांनी दिले. या बैठकीला जिल्हा परिषद प्रकल्प संचालक माधुरी परिट, ग्रामपंचायत विभागो उपमुख्य कार्यकारी अरूण जाधव, करवीर प्रांताधिकारी हरिष धार्मिक, करवीर तहसीलदार स्वप्नील राबाडे यांच्यासह अन्य आधिकारी, सरपंच, उपसरपंच उपस्थित होते.
- उद्यापासून 46 स्पॉटवर राहणार वॉच
उद्या गुरूवार (दि.23) पासून जिल्हा परिषद, जिल्हा प्रशासनाची जीपीएस सिस्टीमद्वारे 46 स्पॉटची पाहणी केली जाणार आहे. या ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना केल्या आहेत.








