मॉडर्न पेंटॅथलॉनमध्ये दिप्ती-सौरभला सुवर्ण : अमरावतीच्या दिप्ती काळमेघला पदार्पणातच सुवर्णासह रौप्य
वृत्तसंस्था/ डेहराडून
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या मुलांनी सुवर्णयशाला गवसणी देत स्पर्धेचा 14 वा दिवस गाजविला. मॉडर्न पेंटॅथलॉनमध्ये शेतकरी कुटुंबियातील दिप्ती काळमेघसह सौरभ पाटीलने सुवर्ण पदकाला गवसणी घातली. अमरावतीच्या दिप्तीने पदार्पणातच सुवर्णसह रौप्य पदकाची, तर कोल्हापूरच्या सौरभने सलग दुसऱ्यांदा सुवर्ण भरारी घेतली. 12 वी परिक्षेला दांडी मारत दिप्तीने सुवर्ण भरारी घेतली आहे.
गौलापार येथे सुरू असलेल्या मॉडर्न पेंटॅथलॉनमध्ये सलग दुसऱ्या दिवशी जय महाराष्ट्राचा जयजयकार घुमला. बारावीत शिकणाऱ्या 17 वर्षीय दिप्ती काळमेघने सकाळच्या सत्रात बायथले प्रकारात रूपेरी यश संपादन केले. दुपारच्या सत्रात दिप्तीने सौरभ पाटीलसह सोनेरी यशाला गवसणी घातली. अमरावतीच्या शेतकऱ्याची मुलगी असणारी दिप्ती ही पुण्यात शॉर्क जलतरण क्लबमध्ये शेखर खासनीस यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. दिप्ती काळमेघ ही अमरावतीच्या शिवाजी कॉलेजमध्ये बारावीत विज्ञान शाखेत शिकत आहे. मंगळवार 11 फेब्रुवारीपासून तिची बोर्ड परिक्षा सुरू होत आहे. तरीही पहिले तीन विषयाच्या पेपरला दांडी मारून तिने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत खेळण्याचा मोठा निर्णय घेतला. तो आज सार्थकी ठरला.
मॉडर्न पेंटॅथलॉनमधील बायथले मिश्र रिले प्रकारात महाराष्ट्र सुरूवातीपासून आघाडीवर राहिला. सौरभ पाटील व दिप्ती काळमेघ जोडीने ही शर्यत 15.16.83 मिनिटांत पूर्ण करीत सुवर्ण यश खेचून आणले. मध्यप्रदेशला रौप्य, तर गुजरातला कांस्य पदक मिळाले. 1600 मीटर धावणे, 200 मीटर जलतरण आणि 1600 मीटर धावणे प्रकाराच्या वैयक्तिक बायथले शर्यत दिप्तीने 16.39.10 मिनिटांत पूर्ण करून दुसरे स्थान संपादन केले. मध्यप्रदेशच्या रमा सोनगरने सुवर्ण, तर उत्तराखंडच्या भार्गवी रावतने कांस्यपदक जिंकले.
पुरुषांच्या जलतरण स्पर्धेतील वैयक्तिक प्रकारात पूर्ण कॉश्युम फाटल्याने सौरभला पदकापासून वंचित रहावे लागले. गत गोवा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सौरभने 1 सुवर्ण 1 रौप्यपदक जिंकले होते. 24 वर्षीय सौरभ पाटीलही याच क्लबमध्ये गेली 8 वर्ष सराव करीत आहे. सौरभचे वडिल संजय पाटील शेतीसह पतसंस्थेत काम करतात. दिप्ती व सौरभ या दोघांनाही शेखर खासनीस हे विनामुल्य प्रशिक्षण देत आहेत.

ज्युदोत महाराष्ट्राच्या श्रध्दा चोपडेचे सुवर्ण यश, आकांक्षाला रौप्य
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत ज्युदोमध्ये महाराष्ट्राच्या श्रध्दा चोपडे हिने सुवर्णपदक, तर आकांक्षा शिंदे हिने रौप्यपदकाची कमाई केली. मोनल संकुलात सुरू असलेल्या ज्युदो स्पर्धेत महिलांच्या 52 किलो गटात श्रद्धा हिने अंतिम लढतीत मेहरुख मकवाना या गुजरातच्या खेळाडूवर एकतर्फी विजय मिळविला. या स्पर्धेतील तिचे हे पहिलेच पदक आहे. यापूर्वी तिने वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय स्पर्धेत दोन सुवर्णपदके जिंकली आहेत. 19 वर्षाची श्रद्धा ही यशपाल सोळंकी यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती संभाजीनगर येथील प्रशिक्षण केंद्रात सराव करीत आहे.
48 किलो गटाच्या अंतिम लढतीत आकांक्षा शिंदे हिने उत्तर प्रदेशच्या अस्मिताला कडवी लढत दिली. मात्र, अस्मिताने अडीच मिनिटांनंतर एका गुणांची कमाई करीत गुणांचे खाते उघडले. त्यानंतर आकांक्षाने गुण मिळविण्यासाठी जीवाचे रान केले. मात्र, बचावात्मक पवित्रा घेतलेल्या अस्मिताने आकांक्षाला गुण मिळणार नाही याची दक्षता घेत सुवर्णपदकावर मोहोर उमटवली. आकांक्षाला अखेर रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. आकांक्षा ही नाशिकची खेळाडू असून तिने या स्पर्धेत प्रथमच पदक जिंकले आहे. नाशिक येथील एच ए एल महाविद्यालयात ती वाणिज्य शाखेचा अभ्यासक्रम करीत आहे.
तलवारबाजीत श्रुती जोशीने जिंकले कांस्यपदक
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या श्रुती जोशीने कास्यपदक पटकावून तलवारबाजीत पदकाचे खाते उघडले. श्रुतीचे वडिल धर्मेद्र जोशी हे नागपूरमध्ये खाजगी वाहनावर ड्रायव्हर असून, तिचे हे राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील पहिलेच पदक आहे. चौखाम्बा हॉलमध्ये सुरू असलेल्या तलवारबाजीतील सायबर प्रकारामध्ये नागपूरच्या श्रुती जोशीने नेत्रदीपक कामगिरी केली.
साखळी सामन्यांमध्ये पहिल्या 32 मध्ये अव्वल स्थान संपादन करून श्रुती पदकची दावेदार बनली होती. सलामीच्या लढतीत हरियाणाच्या मंजूवर 15-2 गुणांनी श्रुतीने दणदणीत विजय मिळविला. जम्मू काश्मीरच्या श्रेयावर 15-10 गुणांनी मात करून तिने उपांत्यपूर्व फेरीत मजल मारली. सुपर 8 लढतीत छत्तीसगडच्या वेदिका खुशीवर तिने 15-10 गुणांनी मोठा विजय संपादन करून पदक निश्चित केले. उपांत्य फेरीत तामिळनाडूची भवानी देवी विरूध्द महाराष्ट्राची श्रुती जोशी ही लढत लक्षवेधी ठरली. ऑलिम्पिकपटू असलेल्या भवानी देवी विरूध्द श्रुतीने चुरशीची झुंज दिली. अटीतटीच्या सामन्यांमध्ये 10-15 गुणांनी भवानी देवी विजयी झाल्याने श्रुतीला कांस्यपदक प्राप्त झाले.
जिम्नॅस्टिक्समध्ये महाराष्ट्राची रूपेरी कामगिरी
अपेक्षेप्रमाणे राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील जिम्नॉस्टिक्समध्ये महाराष्ट्राच्या महिला संघाने रौप्यपदकाची कमाई करीत पदकाचा श्रीगणेशा केला. महाराष्ट्राच्या उर्वी वाघ, शताक्षी टक्के, सलोनी दादरकर, अनुष्का पाटील व सारा रावूल यांनी रूपेरी यश संपादन केले.
भागीरथी संकुलात सुरू असलेल्या स्पर्धेत महाराष्ट्राच्या महिला आर्टिस्टिक संघाने 124.60 गुणांची कमाई करीत रूपेरी यश संपादन केले. प. बंगालने 126.85 गुणांसह सुवर्णपदक पटकाविले, तर ओडिशाला 116.65 गुणांसह कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. महाराष्ट्राच्या उर्वी वाघ, शताक्षी टक्के, सलोनी दादरकर, अनुष्का पाटील व सारा रावूल या संघाने उत्कृष्ट रचना सादर करून डोळ्यांची पारणे फेडली. केवळ वॉल्ट प्रकारात प. बंगालच्या मुलींनी सरस कामगिरी करून बाजी मारली. ऊर्वी व शताक्षी या पुण्यातील इन्फिनिटी जिमनॅस्टिक क्लबमध्ये अजीत जरांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतात. सलोनी व अनुष्का या मुंबईच्या, तर सारा ही ठाण्याची खेळाडू होय.









