जागतिक नेत्यांसह सर्व राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, 170 निमंत्रितांचा समावेश
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जी-20 शिखर परिषदेसाठी भारतात आलेल्या परदेशी पाहुण्यांच्या सन्मानार्थ डिनरचे आयोजन केले होते. शनिवारी सायंकाळी साडेसात वाजल्यानंतर या प्रितीभोजनासाठी भारत मंडपममध्ये पाहुण्यांच्या आगमनाची प्रक्रिया सुरू झाली. जगभरातील राष्ट्रप्रमुख, प्रतिनिधी, भारतातील सर्व राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रीय आणि राज्यमंत्र्यांसह 170 लोकांना या स्नेहभोजनासाठी आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी नालंदा विद्यापीठाच्या बॅकग्राऊंड पॉईंटवर निमंत्रितांचे स्वागत करण्यात आले.
प्रगती मैदानातील भारत मंडपम येथे या डिनरचे आयोजन करण्यात आले होते. परदेशी पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी राष्ट्रपती आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: उपस्थित होते. जेवण सुरू होण्यापूर्वी पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. स्वागतानंतर पाहुणेमंडळी डिनरस्थळी रवाना होत होती. या डिनरमधील मेनू वसुधैव कुटुंबकम ‘एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य’ या भावनेला समर्पित करण्यात आला होता. यामध्ये काश्मिरी कहवा, दार्जिलिंग चहा, मुंबई पाव, अंजीर-पीच मुरब्बा यासह देशातील अनेक प्रसिद्ध पदार्थांचा समावेश करण्यात आला होता.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्यासह फ्रान्स, इटली, जपान, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश, स्पेन, नेदरलँड अशा सर्व देशांचे प्रतिनिधी डिनरमध्ये सहभागी झाले होते. यावेळी राष्ट्रपतींनी ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांच्या पत्नीची भेट घेत त्यांच्याशी बराचवेळ संवाद साधला. तसेच जपानच्या पंतप्रधानांसोबत त्यांच्या पत्नीही उपस्थित होत्या. बांगलादेशचे पंतप्रधान पारंपारिक पेहरावात या सोहळ्यात सहभागी झाल्या होत्या.









