‘सीआयडी’ या मालिकेत ‘फ्रेड्रिक्स’हे पात्र साकारणारे अभिनेते दिनेश फडणीस यांचे निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून ते व्हेंटिलेटरवर होते. मात्र, त्यांची ही झुंज अपयशी ठरली आहे. वयाच्या ५७व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
हृदयविकाराचा झटका आल्यामुळे अभिनेता दिनेश फडणीस यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, ‘सीआयडी’ मालिकेतील दिनेश यांचे सहकलाकार अभिनेते दयानंद शेट्टी यांनी हे वृत्त नाकारले होते. यावेळी दिनेश यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याचे, दया यांनी सांगितले होते. अभिनेते दिनेश फडणीस हे मृत्यूशी झुंज देत असल्याचे देखील त्यांनी म्हटले होते. यानंतर त्यांना नेमकं काय झालं होतं याचा खुलासा करताना दयानंद शेट्टी म्हणाले की, त्यांचे यकृत निकामी झाले होते. यामुळे त्यांची प्रकृती खालावली होती. त्यांच्यावर उपचार देखील सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं आहे. तुंगा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. सोमवारी रात्री १२च्या सुमारास दिनेश फडणीस यांनी अखेरचा श्वास घेतला. आज (५ डिसेंबर) दिनेश त्यांच्या पार्थिवावर मुंबईत अंत्यसंस्कार होणार आहेत.









