वृत्तसंस्था /धर्मशाळा
भारताचा यष्टीरक्षक आणि फलंदाज दिनेश कार्तिकची 2024 ची आयपीएल स्पर्धा शेवटची राहिल. 22 मार्चपासून या स्पर्धेला प्रारंभ होत आहे. दिनेश कार्तिक लवकरच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेणार आहे. 38 वर्षीय दिनेश कार्तिक हा आरसीबीचा खेळाडू आहे. 2008 पासून त्याने आतापर्यंत आयपीएलच्या 16 स्पर्धांमध्ये आपला सहभाग दर्शवला. आयपीएलच्या 16 हंगामामध्ये त्याला केवळ दोन सामने हुकले होते. 2024 ची आयपीएल स्पर्धा ही दिनेश कार्तिकची शेवटची राहिल. आयपीएल स्पर्धा संपल्यानंतर दिनेश कार्तिक आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या निवृत्तीबाबत निर्णय घेईल असे बीसीसीआयच्या प्रवक्त्याने वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. दिनेश कार्तिक हा आयपीएल स्पर्धेतील सर्वात अनुभवी यष्टीरक्षक आणि फलंदाज म्हणून ओळखला जातो.
दिनेश कार्तिकने आयपीएल स्पर्धेच्या आतापर्यंतच्या इतिहासात 6 विविध संघांचे प्रतिनिधीत्व केले आहे. 2008 साली त्याने दिल्ली डेअरडेविल्स संघाकडून या स्पर्धेत पदार्पण केले. त्यानंतर 2011 साली तो किंग्ज इलेव्हन पंजाब संघात दाखल झाला. दरम्यान कार्तिकने 2012 आणि 2013 साली मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधीत्व केले. 2014 च्या आयपीएल स्पर्धेत त्याने पुन्हा दिल्ली डेअरडेविल्समध्ये पुनरागमन केले. 2015 साली रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरने (आरसीबी) दिनेश कार्तिकला 10.5 कोटींच्या बोलीवर खरेदी केले. 2016 आणि 2017 साली त्याने गुजरात लायन्स संघाकडून या स्पर्धेत आपला सहभाग दर्शवला. कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून त्याने आयपीएलच्या चार हंगामात खेळ केला. 2018 साली कार्तिकच्या नेतृत्वाखाली कोलकात नाईट रायडर्सने प्ले ऑफ फेरी गाठली होती. 2019 च्या आयपीएल स्पर्धेच्या गुणतक्त्यात कोलकाताने पाचवे स्थान मिळवले होते. 2022 च्या आयपीएल हंगामासाठी कार्तिकची कोलकाता नाईट रायडर्सने सुटका केली. त्यानंतर आरसीबीने कार्तिकला 5.5 कोटी रुपयांच्या बोलीवर दुसऱ्यांदा खरेदी केले. 2022 च्या आयपीएल स्पर्धेत कार्तिकने फिनिशरची भूमिका बजावताना 16 सामन्यातून 55 धावांच्या सरासरीने 330 धावा जमवल्या. 2022 च्या आयसीसीच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघात दिनेश कार्तिकचा समावेश करण्यात आला होता. ही स्पर्धा ऑस्ट्रेलियात घेण्यात आली होती. दरम्यान विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला उपांत्य फेरीत इंग्लंडकडून पराभूत व्हावे लागले होते.
तामिळनाडूच्या कार्तिकच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दीला म्हणावा तसा वाव मिळू शकला नाही. कारण याच कालावधीत भारतीय संघाला एम. एस. धोनी हा जागतिक दर्जाचा यष्टीरक्षक आणि फलंदाज म्हणून लाभला होता. कार्तिकने 2004 साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपले कसोटी पदार्पण केले असून त्याने आतापर्यंत 26 कसोटीत 1025 धावा जमवल्या असून यष्टीमागे 57 झेल आणि 6 यष्टीचित नोंद केली. त्याने आपली शेवटची कसोटी 2018 साली खेळली होती. कार्तिकने 2004 ते 2019 या कालावधीत वनडे क्रिकेटमध्ये 94 सामन्यात 1752 धावा जमवल्या असून त्याने यष्टीमागे 64 झेल आणि 7 यष्टीचित नोंद केली आहे. 2006 साली त्याने टी-20 प्रकारात आपले पदार्पण केले होते. कार्तिकने 60 टी-20 सामन्यात 686 धावा जमवल्या असून 30 झेल आणि 8 यष्टीचित अशी नोंद केली आहे. आयपीएलमध्ये त्याने 242 सामने खेळले आहेत.









