वृत्तसंस्था/ ऍडलेड
भारतीय संघ सोमवारी ऍडलेडमध्ये दाखल झाला असून बुधवारी या ठिकाणी बांगलादेशविरुद्ध भारताचा सामना होणार आहे. पर्थमध्ये झालेल्या सामन्यात भारताला पराभवाचा धक्का बसल्यानंतर गुणतक्त्यात दुसऱया स्थानी घसरण झाली. या पराभवानंतर त्यांना आणखी एक धक्का बसला असून यष्टिरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक जखमी झाला आहे. त्यामुळे बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात तो खेळण्याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.
कार्तिकला द.आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यावेळी यष्टिरक्षण करताना पाठदुखीचा त्रास होऊ लागल्याने तो मैदानाबाहेर गेला आणि 16 व्या षटकापासून त्याच्या जागी रिषभ पंतने यष्टिरक्षण केले होते. अतिथंड वातावरणामुळे त्याला पाठदुखीचा हा त्रास होत असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्याची अधिक तपासणी केल्यानंतर दुखापतीचे स्वरूप निश्चित होणार असले तरी अशा प्रकारच्या किरकोळ दुखापतीच्या वेदना दोन ते पाच दिवसांत कमी होतात. ‘त्याच्या पाठीच्या खालच्या बाजूला वेदना होऊ लागल्या. त्याचे स्वरूप अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र आपली मेडिकल टीम त्याला फिट ठेवण्यासाठी शेक देणे, मसाज करणे, असे प्रयत्न करीत आहे. त्यामुळे तो बुधवारच्या सामन्यात खेळणारच नाही, असे एवढय़ातच मानू नका,’ असे बीबीसीआयमधील एका माहितगार सूत्राने सांगितले.
आतापर्यंतच्या दोन सामन्यात कार्तिकला अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही. त्याने या सामन्यात 1 व 6 धावा जमविल्या. त्याला फिनिशर म्हणून ओळखले जाते. पण पर्थच्या वेगवान व उसळत्या खेळपट्टीवर त्याला जुळवून घेता आले नाही. त्याने सूर्यकुमार यादवसमवेत 52 धावांची भागीदारी केली असली तरी त्यात त्याचा वाटा फक्त 6 धावांचा होता. यामुळे त्याच्यावर टीकाही होत आहे. आक्रमक खेळणाऱया पंतला संघाबाहेर ठेवल्याबद्दल संघाच्या कोचिंग स्टाफवरही टीका होऊ लागली आहे. कसोटीमध्ये पंतने ऑस्ट्रेलियात चांगली कामगिरी केली असल्याने त्याला संधी दिली जावी, असे बोलले जात आहे.









