भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचे प्रतिपादन
बेंगळूर / वृत्तसंस्था
यंदा ऑस्ट्रेलियात होणाऱया आगामी टी-20 वर्ल्डकपसाठी दिनेश कार्तिक-हार्दिक पंडय़ा महत्त्वाचे शिलेदार ठरु शकतात, असे प्रतिपादन भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी केले. इंग्लंड दौऱयाअखेर वर्ल्डकपसाठी 18 ते 20 खेळाडू निश्चित करण्याचा आपला प्रयत्न असेल, असे त्यांनी यावेळी सांगितले.
‘दिनेश कार्तिकने मागील काही सामन्यात जी चुणूक दाखवली, ती लक्षवेधी होती. त्याच्यासारखा आक्रमक पर्याय हाताशी असल्याने टी-20 वर्ल्डकप संघ निवडताना आम्हाला आणखी प्रयोग राबवता येतील’, असे द्रविड म्हणाले. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आयोजित 5 सामन्यांची टी-20 मालिका 2-2 अशी बरोबरीत राहिल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. उभय संघातील पाचवी व शेवटची टी-20 पावसामुळे होऊ शकली नाही.
‘मागील 2-3 वर्षात आयपीएल स्पर्धेत दिनेश कार्तिक सातत्यपूर्ण योगदान देत आला असून राजकोटमधील अर्धशतकी खेळी त्याची लढवय्या प्रवृत्ती दर्शवणारी होती. फक्त डेथ ओव्हर्सचा विचार करता दिनेश कार्तिक व हार्दिक पंडय़ा उत्तम स्पेशालिस्ट आहेत. चौथ्या टी-20 मध्ये शेवटच्या 5 षटकात धावांची आतषबाजी होणे अतिशय निकडीचे होते. त्यात कार्तिक व पंडय़ा यांना यश लाभले’, याचा द्रविड यांनी पुढे उल्लेख केला.
कोअर ग्रुपची निश्चिती लवकरच
द्रविडनी कोणतीही टाईमलाईन आखणे दृष्टिक्षेपात नसले तरी इंग्लंडविरुद्ध टी-20 मालिकेअखेर ऑस्ट्रेलियातील टी-20 वर्ल्डकपसाठी 18 ते 20 संभाव्य खेळाडू निश्चित करण्यावर त्यांचा भर असणार आहे. भारत व इंग्लंड यांच्यात एकमेव कसोटीनंतर दि. 7 ते 17 जुलै या कालावधीत मर्यादित षटकांचे 6 सामने होणार आहेत.
स्पर्धा जवळ येत असताना शक्य तितक्या लवकर संघ निश्चित होणे अर्थातच आवश्यक असते. वर्ल्डकपसाठी अंतिम संघ 15 खेळाडूंचाच असेल. मात्र, त्यासाठी 18 ते 20 खेळाडू पहिल्या टप्प्यात निश्चित करावे लागतील. अचानक दुखापत झाली तर अशावेळी काहीही अडचण होऊ नये, यासाठी राखीव खेळाडू सज्ज असणे महत्त्वाचे ठरते. आता आयर्लंडविरुद्ध व त्यानंतर इंग्लंडविरुद्ध होणाऱया मालिकेदरम्यान प्रारंभिक चमू निश्चित करण्यावर आमचा भर असणार आहे’, असे द्रविड एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले.

टीकेच्या केंद्रस्थानावरील ऋतुराज गायकवाड व अय्यरला पाठबळ
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिकेतील खराब प्रदर्शनामुळे ऋतुराज गायकवाड व श्रेयस अय्यर टीकेचे लक्ष्य ठरत आले असून या कारणामुळे त्यांना आगामी टी-20 वर्ल्डकपसाठी कोअर ग्रुपमध्ये संधी मिळण्याची शक्यताही धुसर झाली असल्याचे मानले जाते. ऋतुराजला 5 सामन्यात केवळ 96 तर श्रेयस अय्यरला 5 सामन्यात अवघ्या 94 धावांवर समाधान मानावे लागले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ऋतुराजला अनेक संधीनंतरही सूर सापडलेला नाही. शिवाय, श्रेयस अय्यर अव्वल दर्जाच्या जलद गोलंदाजांविरुद्ध झगडतो, हे सातत्याने अधोरेखित होत आले आहे. राहुल द्रविड यांनी मात्र या दोन्ही खेळाडूंच्या पाठीशी उभे राहण्याला प्राधान्य दिले आहे.
‘आम्ही सत्त्वर कोणत्याही निकर्षाप्रत येणार नाही. केवळ एक सामना किंवा एका मालिकेच्या माध्यमातून खेळाडूंना जोखणे मला केव्हाही मान्य असत नाही. श्रेयस यापूर्वी काही प्रतिकूल खेळपट्टीवर उत्तम खेळला. शिवाय, ऋतुराजनेही एकदा आपला बहारदार फॉर्म दाखवला. आम्ही कोणत्याही खेळाडूबाबत निराश नाही’, असे द्रविड यांनी ठामपणे नमूद केले.
गतवर्षापेक्षा यंदाचा इंग्लिश संघ अधिक मजबूत
मागील हंगामात 4 कसोटी सामन्यात खेळलेल्या खेळाडूंच्या तुलनेत यंदा बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखालील इंग्लंडचा संघ अधिक मजबूत आहे, असे निरीक्षण राहुल द्रविड यांनी यावेळी नोंदवले. भारत-इंग्लंड यांच्यात मागील हंगामात खेळवणे बाकी राहिलेली पाचवी कसोटी दि. 1 ते 5 जुलै या कालावधीत होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर द्रविड बोलत होते.
‘इंग्लंडचा संघ सध्या अतिशय उत्तम बहरात राहिला आहे. त्या तुलनेत गतवर्षी ते बॅकफूटवर असल्याप्रमाणे खेळत होते. अलीकडील कालावधीत त्यांनी काही उत्तम विजय खेचून आणले. दुसरीकडे, आमचाही संघ उत्तम आहे. त्यामुळे, एकमेव कसोटी लक्षवेधी ठरु शकते’, असे ते म्हणाले. बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखालील इंग्लंडने अलीकडेच न्यूझीलंडविरुद्ध स्पृहणीय विजय संपादन केला आहे.
भारताचे आगामी सामने
तारीख / लढत / ठिकाण
26 जून / आयर्लंडविरुद्ध पहिली टी-20 / मॅलाहिदे
28 जून / आयर्लंडविरुद्ध दुसरी टी-20 / मॅलाहिदे
1 ते 5 जुलै / इंग्लंडविरुद्ध पाचवी कसोटी / बर्मिंगहम
7 जुलै / इंग्लंडविरुद्ध पहिली टी-20 / साऊदम्प्टन
9 जुलै / इंग्लंडविरुद्ध दुसरी टी-20 / बर्मिंगहम
10 जुलै / इंग्लंडविरुद्ध तिसरी टी-20 / नॉटिंगहम
12 जुलै / इंग्लंडविरुद्ध पहिली वनडे / द ओव्हल
14 जुलै / इंग्लंडविरुद्ध दुसरी वनडे / लॉर्ड्स
17 जुलै / इंग्लंडविरुद्ध तिसरी वनडे / मँचेस्टर.









