बेळगाव : वारकऱ्यांच्या वेशातील बालविद्यार्थी, त्यांच्या खांद्यावर पालखी, टाळ-चिपळ्यांचा गजर आणि मुखी विठ्ठलनाम अशा वातावरणात बुधवारी अनेक शाळांमधून आषाढी एकादशीच्या निमित्ताने दिंडी काढण्यात आली. एसकेई सोसायटी संचालित व्ही. एम. शानभाग मराठी आणि एम. आर. भंडारी कन्नड शाळेतर्फे आरपीडी कॉलेजच्या गिरी सभागृहात विविध सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. तत्पूर्वी सकाळी विद्यार्थ्यांनी परिसरामधून दिंडी काढली. यानंतर सभागृहात झालेल्या मुख्य कार्यक्रमात मुख्याध्यापिका सावित्री नायक यांनी स्वागत केले. प्रमुख पाहुण्या म्हणून उषा शानभाग उपस्थित होत्या. त्यांनी आषाढी एकादशीचे महत्त्व सांगितले. विद्यार्थ्यांनी वक्तृत्व आणि गायन सादर केले. यानंतर नृत्य स्पर्धा झाल्या. परीक्षक म्हणून उमा शहापूरकर यांनी काम पाहिले.
केम्ब्रिज इंटरनॅशनल स्कूल
टीचर्स कॉलनी, खासबाग येथील केम्ब्रिज इंटरनॅशनल स्कूलमध्ये आषाढी एकादशीनिमित्त पालखी सोहळा उत्साहात साजरा झाला. शाळेच्या प्रांगणात विठ्ठलाच्या प्रतिमेचे व पालखीचे पूजन चेअरमन मिलिंद भातकांडे यांच्या हस्ते करण्यात आले. मुख्याध्यापिका शाजिया जमादार यांनी पालखीची आरती केली. केजी ते सहावीच्या विद्यार्थ्यांनी संत तुकाराम, नामदेव, ज्ञानदेव, रखुमाई-विठ्ठल यांची वेशभूषा साकारली होती. अन्य विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांचा वेश परिधान केला होता. मुलींनी नऊवारी साडीसह डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन पालखीचा आनंद घेतला. ‘जय हरी विठ्ठल’, ‘जय जय राम कृष्ण हरी’ अशा जयघोषात पालखी सोहळ्याला प्रारंभ झाला. सोहळा यशस्वी करण्यासाठी पूनम मंगणाकर, पूजा कुंटय्या, कविता पोळ, पिया रामचंद्रन, वृंदा कुलकर्णी यांनी तसेच शिक्षक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. आषाढी एकादशीनिमित्त शास्त्राrनगर येथील ज्ञानमंदिर शाळेतर्फेसुद्धा दिंडी काढण्यात आली.









