‘एएमएमके’ एनडीएपासून दुरावा : नेते टीटीव्ही दिनकरन यांनी घोषणा
वृत्तसंस्था/चेन्नई
पुढील वर्षी 2026 मध्ये होणाऱ्या तामिळनाडू विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपला राज्यात मोठा धक्का बसला आहे. लोकसभा निवडणुकीत सहयोगी असलेल्या अम्मा मक्कल मुन्नेत्र कझगम (एएमएमके) या पक्षाने एनडीए सोडण्याचा निर्णय जाहीर केला आहे. पक्षाचे सरचिटणीस टीटीव्ही दिनकरन यांनी गुरुवारी या निर्णयाची घोषणा केली. एनडीए सोडणारा ‘एएमएमके’ हा दुसरा पक्ष आहे. यापूर्वी, एआयएडीएमकेमधून हकालपट्टी करण्यात आलेल्या ओ पनीरसेल्वम यांनी त्यांचा पक्ष युतीतून बाहेर काढला होता.
2024 च्या लोकसभा निवडणुकीत ‘एएमएमके’ने भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला होता. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणे देशासाठी सुकर असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला होता. परंतु सार्वत्रिक निवडणुका आणि विधानसभा निवडणुकांमध्ये फरक आहे. त्यामुळे आता आपला पक्ष ‘एएमएमके’ डिसेंबरमध्ये कार्यकर्त्यांशी सल्लामसलत केल्यानंतर नवीन युतीचा निर्णय घेईल, असे दिनकरन यांनी जाहीर केले.
एआयएडीएमके गटांना एकत्र आणण्याचे अमित शाह यांचे प्रयत्न अयशस्वी झाले आहेत. त्यांनी थलापथी विजय यांच्या तमिलागा वेत्री कझगम (टीव्हीके) सह इतर पक्षांशी युती करण्याची मोकळीक दिली आहे. चेन्नईतील अलवरपेट येथे पक्ष नेत्यांची बैठक झाली, ज्यामध्ये तीन महत्त्वाचे ठराव मंजूर करण्यात आले. यामध्ये एनडीएपासून औपचारिकरित्या वेगळे होण्याचा निर्णय घेण्यात आला, असेही दिनकरन पुढे म्हणाले. माजी मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांनीही यापूर्वी भाजप आघाडीपासून स्वत:ला दूर केले आहे. ओपीएस राज्याचा दौरा करणार आहेत. त्यांचा गट सध्या कोणत्याही पक्षासोबत नाही. ओपीएस यांनी एआयएडीएमकेमध्ये एकता आणण्याबाबतही बोलले आहे. पक्षाची गमावलेली ताकद परत आणण्यासाठी ते सर्व गटातील लोकांना एकत्र करण्यात गुंतले आहेत.









