पेडणे : नागपूर येथील भरत मलिक क्रीडा मंडळाचे अध्यक्ष दिलीप भरत मलिक हे सध्या भारताचा दौरा सायकलद्वारे करत आहेत. त्यांचे नुकतेच आगमन धारगळ येथील राष्ट्रीय महामार्ग 66 वर झाले. यावेळी अग्निशामक दलाचे अधिकारी प्रशांत धारगळकर, बहुजन समाजाचे नेते उमेश तळवणेकर, सुनील नाईक आदींनी मलिक यांचे स्वागत केले. यावेळी त्यांच्याशी या प्रवासासंबंधी चर्चा करण्यात आली. स्वच्छ नागपूर सुंदर नागपूर, स्वच्छ भारत अभियान, देशातील जे शहीद जवान झालेले आहेत, त्यांना याद्वारे श्रद्धांजली आणि बेटी बचाव बेटी पढाव, झाडे जगवा निसर्ग वाचवा, वायू प्रदूषण टाळा, देशभरात प्रदूषणमुक्त प्रकल्प, व्यसन मुक्तता, असा संदेश देण्यासाठी आपण देशभर सायकल यात्रा 26 जानेवारी 2022 रोजी सुरू केली होती. त्यात पहिला टप्पा 31 ऑगस्ट 2022 रोजी एकवीस हजार दोनशे पन्नास कलोमीटर, 5 सप्टेंबर 2022 रोजी सुरू केलेला दुसरा टप्पा 19 जानेवारी 2023 रोजी पूर्ण करत असताना 11618 किलोमीटर प्रवास केला.
तिसरा टप्पा 26 जानेवारी 2023 रोजी सुरू करून 24 एप्रिल 2023 रोजी पूर्ण करत असताना 9630 किलोमीटरची सायकल यात्रा झाली. चौथा टप्पा 12 मे 2023 ते 15 ऑगस्ट 2023 पर्यंत 7500 किलोमीटरचा टप्पा गाठायचा आहे. जेणेकरून पन्नास हजार 86 किलोमीटर आपण सायकलने प्रवास करून गिनीज रेकॉर्ड बुक मध्ये नोंद करण्यासाठी आणि एक चांगला संदेश देण्यासाठी आपण संकल्प केल्याचे दिलीप मलिक यांनी सांगितले. देशभरातील युवाशक्ती व्यसनापासून चार पावले दूर राहावी, शारीरिक तंदुऊस्त राखण्यासाठी देश हित लक्षात घेऊन देशाच्या हितासाठी कार्य करावे, आपला परिसर स्वच्छ ठेवण्याबरोबरच इतर परिसर सुंदर कसा राहील यावर प्रयत्न करावेत, असा संदेश दिल्याचे मलिक यांनी सांगितले. प्रदूषण मुक्त परिसर हीच आपली संकल्पना असून त्या नजरेतून आपण पूर्ण भारत देशभर सायकल यात्रा करत आहे. दिवसाला 120 किलोमीटरचा पल्ला आपण प्रवास करत असतो. त्यात अनेक खास खळगे अडचणी नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागतो. तरीही आपण न डगमगता हा संकल्प आपल्याला पूर्ण करायचा आहे, असे मलिक यांनी सांगितले.









