सनातन धर्मावरील वक्तव्य अंगलट : भाजपसह इतरांकडून टीका
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली, चेन्नई
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचे पुत्र आणि राज्य सरकारमधील मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माबाबत अत्यंत वादग्रस्त विधान केले आहे. त्यांनी सनातन धर्माची तुलना डेंग्यू आणि मलेरिया या आजारांशी केली आहे. या वादग्रस्त वक्तव्यानंतर उदयनिधी स्टॅलिन यांच्यावर भाजपसह विविध स्तरातून टीका करण्यात येत आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनीही उदयनिधी स्टॅलिन यांच्यावर कठोर शब्दात प्रहार ओढले आहेत. तसेच काँग्रेसचे नेते आचार्य प्रमोद यांनीही उदयनिधी स्टॅलिन यांना फटकारले आहे. उदयनिधी यांच्या वक्तव्यामुळे ‘इंडिया’ आघाडीची कोंडी होण्याची चिन्हे आहेत.
उदयनिधी हे इंडिया या आघाडीतील महत्त्वाचा घटक पक्ष द्रमुकच्या अध्यक्षांचे पुत्र आहेत. यामुळे उदयनिधींचे वक्तव्य नाकारणे काँग्रेससमवेत अन्य पक्षांना जड जाणार आहे. देशभरातून होणारा विरोध पाहता काँग्रेसने तूर्तास नरमाईची भूमिका स्विकारली आहे. तर भाजपने उदयनिधी यांच्या वक्तव्यावरून काँग्रेसला हिंदूविरोधी ठरविण्याचा प्रयत्न चालविला आहे.
सनातन धर्म हा सामाजिक न्याय आणि समतेच्या विरोधात आहे. काही गोष्टींचा विरोध करता येत नाही. त्या संपवल्याच पाहिजेत. आपण डेंग्यू, मलेरिया किंवा कोरोनाचा विरोध करू शकत नाही. त्यांना संपवायलाच हवे. तसेच, सनातन धर्मालाही संपवायचं आहे,” असे विधान उदयनिधी स्टॅलिन यांनी केले. या कार्यक्रमात बोलण्याची मला संधी दिल्याबद्दल मी आयोजकांचे आभार मानतो, असेही ते पुढे म्हणाले.
तामिळनाडू भाजप प्रदेशाध्यक्षांनी फटकारले
उदयनिधी स्टॅलिन यांच्या विधानावर प्रत्युत्तर देत तामिळनाडू भाजप अध्यक्ष के अन्नामलाई यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट करत उदयनिधी स्टॅलिन यांना फटकारले. तुम्ही आणि तुमच्या वडिलांनी सर्व कल्पना ख्रिश्चन मिशनऱ्यांकडून विकत घेतल्या आहेत. त्या धर्मप्रचारकांचे काम तुमच्यासारख्या मूर्खांना त्यांच्या द्वेषयुक्त विचारसरणीचा प्रचार करण्यासाठी तयार करणे हे होते. तामिळनाडू ही अध्यात्माची भूमी आहे, असेही त्यांनी ठणकावले.
भाजप नेते अमित मालवीय यांनी एका ट्विटमध्ये राहुल गांधींचा व्हिडिओ शेअर करत त्याची तुलना उदयनिधी स्टॅलिन यांच्या द्वेषपूर्ण भाषणाशी केली आहे. उदयनिधी स्टॅलिन यांचे द्वेषपूर्ण भाषण हिंदी सबटायटल्ससह लिहिले. काँग्रेसचा मित्रपक्ष द्रमुकचे नेते सनातन धर्माचा अपमान करतात. याप्रकरणी काँग्रेसचे मौन अयोग्य असून ‘इंडिया’ने भूमिका स्पष्ट करावी, असे मालवीय म्हणाले.
भाजपाध्यक्ष नड्डा हल्लाबोल
भोपाळमधील सभेदरम्यान भाजपाध्यक्ष न•ा यांनीही स्टॅलिन यांच्यावर टीका केली. नुकतेच मुंबईत ‘इंडिया’ या अहंकारी युतीचे लोक गोळा झाले होते. एकीकडे मोदींच्या नेतृत्त्वातील सरकार देशाला पुढे नेण्याचे काम करताना भारताचा जगभर जयजयकार होत आहे, तर दुसरीकडे अहंकारी युती आपल्या संस्कृतीला धक्का देत आहे, असा हल्लाबोल न•ा यांनी चढवला.
दिल्ली पोलिसात तक्रार
तामिळनाडू सरकारचे क्रीडामंत्री आणि मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माबाबत दिलेल्या वक्तव्यप्रकरणी दिल्ली पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयातील वकील आणि सामाजिक कार्यकर्ते विनीत जिंदाल यांनी उदयनिधी स्टॅलिन यांच्याविरोधात दिल्ली पोलिसांकडे गुन्हा दाखल केला आहे. सनातन धर्माविरोधात प्रक्षोभक भाषण दिल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.









