निधी नसल्याचे कारण, गोगटे सर्कलमध्ये कचराकुंडीचे स्वरूप
बेळगाव : कॅन्टोन्मेंट बोर्ड परिसरातील उद्यानांची दुरवस्था झाली आहे. निधी नसल्याचे कारण देत बोर्डने दुर्लक्ष केल्याने उद्यानांना कचराकुंडीचे स्वरुप प्राप्त झाले आहे. गोगटे सर्कल येथील उद्यानात सर्वत्र कचरा व दुर्गंधी पसरली आहे. रात्रीच्यावेळी अवैध धंदे राजरोसपणे सुरू असल्याने कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाने यावर निर्बंध आणण्याची मागणी केली आहे. कॅन्टोन्मेंट बोर्ड परिसरात शर्कत पार्क, क्वीन्स गार्डन तसेच गोगटे सर्कल येथे उद्याने आहेत. क्वीन्स गार्डन व शर्कत पार्क येथे काही प्रमाणात स्वच्छता असल्याने येथे नागरिकांची ये-जा असते. परंतु गोगटे सर्कल येथील उद्यानातील अस्वच्छता पाहून कोणी जाण्यासही तयार नसते. बऱ्याचवेळा टॅफिक सिग्नलवरील विक्रेते याठिकाणी झोपड्या बांधून राहतात. यामुळे दुर्गंधी पसरली असून परिसरातून प्रवास करणाऱ्या नागरिकांनाही याचा त्रास सहन करावा लागतो.
उद्यानांच्या विकासासाठी कॅन्टोन्मेंट बोर्डकडे निधी नसल्याने मागील काही वर्षापासून कोणतेही विकासकाम करण्यात आलेले नाही. परंतु विकासकाम नसले तरी उद्यानाची स्वच्छता करणे आवश्यक आहे. उद्यानातील आसन व्यवस्थेची झालेली मोडतोड, सर्वत्र प्लास्टिक कचरा, वाढलेले गवत, झाडांच्या पडलेल्या फांद्या अशी स्थिती उद्यानामध्ये पाहायला मिळत आहे. रेल्वे स्टेशन रोडवरील विक्रेते शिल्लक राहिलेले पदार्थ व कचरा उद्यानाच्या एका कोपऱ्यात फेकत आहेत. यामुळे भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला असल्याने रात्रीच्यावेळी रेल्वेसाठी येणाऱ्या प्रवाशांना याचा त्रास होत आहे. रेल्वेने उतरलेले प्रवासी, पर्यटक याच मार्गे शहरात येतात. त्यामुळे शहराची एक वेगळी बाजू पर्यटकांसमोर दाखविली जात आहे. त्यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागात तरी स्वच्छता ठेवावी, अशी मागणी होत आहे. तसेच याठिकाणी कोणालाही झोपडी घालण्यास तसेच राहण्यास मनाई घालण्याची मागणी होत आहे.









