वार्ताहर/सांबरा
मुतगे येथे बसथांबा एकीकडे व तर निवारा शेड दुसरीकडे अशी परिस्थिती असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यामुळे उन्हाळा असो किंवा पावसाळा असो प्रवाशांवर रस्त्याशेजारी थांबण्याची वेळ आली आहे. वास्तविक पाहता ज्या ठिकाणी बसथांबा असतो तेथे नजीकच निवाराशेड बांधणे गरजेचे असते. मात्र येथे निवारा शेड चुकीच्या ठिकाणी बांधण्यात आला आहे. बेळगाव-बागलकोट राज्यमार्गाच्या ऊंदीकरणानंतर पूर्वभागातील अनेक गावांमध्ये निवारा शेड उभारण्यात आले आहेत. यातील अपवाद वगळता सर्व निवारा शेड चुकीच्या ठिकाणी बांधले आहेत. त्यामुळे सध्या निवाराशेड वापराविना पडून आहेत. निवाराशेडना झाडाझुडपांनी व्यापले असून काही निवाराशेड तर भटक्या कुत्र्यांचे आश्रयस्थान बनले आहेत. काही मोडकळीस आले आहेत. पूर्व भागातून दररोज बेळगावला येणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. त्यामुळे निवाराशेड योग्य ठिकाणी बांधणे अत्यंत गरजेचे आहे. संबंधित लोकप्रतिनिधींनी आवाज उठवून योग्य ठिकाणी निवारा शेड उभारण्यासाठी शासनाचे लक्ष वेधण्याची गरज असल्याचे मत प्रवाशांतून व्यक्त करण्यात येत आहे.









