शिक्षक, विद्यार्थी, पालक चिंतेत, नादुरुस्त शाळांचा प्रश्न ऐरणीवर
प्रतिनिधी/ बेळगाव
शैक्षणिक वर्षाला प्रारंभ झाला आहे. दरम्यान शाळा प्रारंभोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मात्र जिल्ह्यातील तब्बल 2204 शाळांच्या वर्ग खोल्या जीर्ण झाल्या आहेत. त्यामुळे शिक्षक विद्यार्थ्यांसाठी धोक्याची घंटा आहे. शिवाय पालकांतून चिंता व्यक्त होऊ लागली आहे.
उत्तम दर्जेदार शिक्षणासाठी शाळा इमारती महत्त्वाच्या आहेत. मात्र जिल्ह्dयातील अनेक शाळांच्या वर्गखोल्यांची दुरवस्था झाली आहे. तर काही वर्ग खोल्या मोडकळीस आल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. दरवर्षी सरकारी शाळांच्या वर्गखोल्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना गळक्या आणि मोडक्या शाळेतच शिक्षण घ्यावे लागते. शिवाय धोका स्वीकारत शिक्षणाचे धडे गिरवावे लागतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शाळा दुरुस्ती कधी होणार? अशा संतप्त प्रतिक्रिया पालकांतून उमटू लागल्या आहेत.
बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात 417 तर चिकोडी शैक्षणिक जिल्ह्यात 1787 शाळा खोल्यांची दुर्दशा झाली आहे. तर काही वर्ग खोल्या मोडकळीस आल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना धोकादायक परिस्थितीत शिक्षण घ्यावे लागत आहे. तर काही वर्ग खोल्यांच्या भिंतीना तडे गेले आहेत. त्यामुळे भितीच्या छायेखालीच शाळा भरताना दिसत आहे. अशा परिस्थितीमुळे काही शाळांमध्ये दोन वर्ग एकाच खोलीत भरविण्याची वेळ आली आहे.
काही शाळांमध्ये वर्ग खोल्यांच्या नादुरुस्तीबरोबर पाणी आणि स्वच्छतागृहाचा अभाव आहे. त्यामुळे शिक्षक व विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ लागली आहे. विशेषत: विद्यार्थिनींची कुचंबणा होत आहे. त्यामुळे शैक्षणिक जीवनावर परिणाम होऊ लागला आहे. महात्मा फुले रोड होसूर येथील सरकारी प्राथमिक कन्नड शाळा क्र. 4 मध्ये दोन खोल्या जीर्ण झाल्या असून पावसाळ्यात गळती लागत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना पाण्यात बसूनच शिक्षण घेण्याची वेळ येत आहे. नादुरुस्त शाळांकडे प्रशासन लक्ष देणार का? हेच आता पाहावे लागणार आहे.
नितेश पाटील, (जिल्हाधिकारी)
मोडकळीस आलेल्या शाळा खोल्या न वापरण्याच्या सूचना यापूर्वी देण्यात आल्या आहेत. गतवर्षी विवेक योजनेंतर्गत प्रत्येक आमदाराला वीस खोल्या बांधण्यासाठी अनुदान देण्यात आले होते. 200 शाळांच्या वर्ग खोल्यांची दुरुस्ती केली आहे. शिवाय जीर्ण झालेल्या वर्ग खोल्यांच्या दुरुस्तीसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.









