हेस्कॉमने दुरुस्ती करण्याची मागणी
बेळगाव : राणी चन्नम्मानगर येथील विद्युतखांब कोसळण्याच्या स्थितीत आहे. परंतु, हेस्कॉमच्या कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने विद्युतखांब केव्हा कोसळतील, याची शाश्वती नाही. विद्युतखांब जमिनीपासून पूर्ण निखळला असून एखादा अपघात घडल्यास याची जबाबदारी हेस्कॉम घेणार का? असा प्रश्न स्थानिकांमधून विचारला जात आहे. चन्नम्मानगर परिसरातील बरेच विद्युतखांब कलंडले आहेत. काही ठिकाणी विद्युतखांबांना सपोर्ट नसल्याने ते एका बाजूला कलंडत आहेत. अनेकवेळा तक्रार करूनदेखील हेस्कॉमकडून वेळच्या वेळी दुरुस्ती केली जात नाही. बुधवारी सकाळी मेडप्लस दुकानाशेजारी अशाचप्रकारे एक विद्युतखांब कोसळण्याच्या स्थितीत होता. त्या ठिकाणी अपघात होऊ नये, यासाठी बॅरिकेड लावण्यात आले. परंतु, अनेक ठिकाणी अशीच स्थिती असल्याने नाराजीचा सूर उमटत आहे.









