मद्यपींसाठी बनले सोयीचे : मनपा प्रशासनाची डोळेझाक,विकास करून विविध खेळाचे साहित्य बसविण्याची मागणी

प्रतिनिधी /बेळगाव
वडगाव परिसरात नाझर कॅम्प येथे एकमेव बालोद्यान आहे. पण या उद्यानाची दुरवस्था झाली असून उद्यानाचा वापर बालकांना खेळण्यासाठी होण्याऐवजी जनावरांना चारण्यासाठी केला जात आहे. तसेच रात्रीच्या वेळी मद्यपींची गर्दी होत असल्याने बालोद्यान मद्यपीसाठी सोयीचे बनले असल्याने परिसरातील रहिवाशांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
शहर स्मार्ट सिटी बनवित असताना विविध ठिकाणी असलेली उद्याने स्मार्ट बनविण्यासाठी कोट्यावधी निधीची तरतूद करण्यात येत आहे. पण वर्षानुवर्षे दुरवस्था झालेल्या वडगाव परिसरात एकमेव असलेल्या बालोद्यानाचा विकास करण्याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. एरवी विकासकामे राबविल्याच्या गप्पा मारणाऱ्या मनपाच्या अभियंत्यांनी याकडे कानाडोळा केला आहे. केवळ स्मार्ट सिटी योजनेमधून उद्यानाकरिता कोट्यावधी निधी खर्चून विकास करण्यात येत आहे. शहरातील बहुतांश उद्यानाची दुरवस्था झाली असून यापैकीच वडगाव नाझर पॅम्प येथील बालोद्यान आहे.
बालोद्यान म्हणजे कचराकुंडी बनले असून खेळाचे साहित्य खराब झाल्याने उद्यानात गवत वाढले आहे. काहीवेळा जनावरांना चारण्यासाठी उद्यानाचा वापर केला जात आहे. उद्यानामध्ये कचरा टाकला जात आहे. तसेच मद्यपांवर पोलीस प्रशासनाचा कोणताच वचक नसल्याने रात्रीच्यावेळी उद्यानात बसून मद्यपान करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे परिसरात मद्याच्या रिकाम्या बाटल्या, पाकिटे आणि ग्लास टाकण्यात आले आहेत. याठिकाणी असलेल्या खुर्च्या खराब झाल्या असून खेळाच्या साहित्याची मोडतोड झाली आहे. उद्यानातील पाळणेच गायब झाल्याने केवळ सागांडे शिल्लक आहेत. जवळ पाण्याची सुविधा असूनदेखील उद्यान ओसाड बनले असल्याने परिसरातील रहिवाशांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. या परिसरात एकच उद्यान असल्याने विकास करून विविध खेळाचे साहित्य बसविण्यात यावे तसेच उद्यानात लॉन व झाडे लावून परिसर हिरवागार करून मुलांसाठी चांगले उद्यान उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.









