सरकारने पर्यटनदृष्टय़ा लक्ष देण्याची गरज

प्रतिनिधी /पणजी
भारतातील आद्य पक्षीशास्त्रज्ञ डॉ. सलीम अली यांच्या नावाने सुरू असलेले राज्यातील एकमेव असे राष्ट्रीय पक्षी अभयारण्य सध्या दुरावस्थेच्या गर्तेत सापडले आहे. राज्यात एकमेव असलेल्या या पक्षी अभयरण्याकडे सरकारने पर्यटनदृष्टय़ा लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. ज्या हेतूने हे पक्षी अभयारण्य निर्मित करण्यात आले, त्याचा हेतू सद्यःस्थितीत साध्य होताना दिसत नाही. कारण या अभयारण्याकडे दुर्लक्ष होत असल्याने अभयारण्यात असलेली सोयी-सुविधा मोडकळीस आलेल्या आहेत.
विविध जातीचे पक्षी, इतर जलीय वनस्पती आणि जीवजंतू पाहण्यासाठी पर्यटकांना आकर्षित करून त्यातून पर्यटनदृष्टय़ा विकास साधण्याच्या हेतूने 1988 मध्ये डॉ. सलीम अली पक्षी अभयारण्याची निर्मिती करण्यात आली होती. ठिकाणी असणारे लाकडी बाक, बाबूंच्या सहाय्याने पाण्यावर उभारलेल्या पायवाटा, विविध जातीचे पक्षी व कलाकृती हे सर्व जवळून पाहताना पर्यटकांनाही सुरुवातीला आनंद मिळाला. परंतु सध्या याच्या उलट अनुभव येत असून, येथे असणाऱया सोयी-सुविधांकडे वेळीच लक्ष न दिल्याने पक्षी अभयारण्याला बकाल अवस्था प्राप्त झाली आहे. या ठिकाणी येणारे देशी-विदेशी पर्यटक येथील निसर्गाचा अनुभव घेताना हिरमुसल्या मनाने परतत आहेत. त्यामुळे सरकारने या अभयारण्याकडे लक्ष देऊन पर्यटनदृष्टय़ा विकास साधावा, अशी पर्यावरण अभ्यासक डॉ. राजेंद्र केरकर यांनी सांगितले.
माडवी नदीच्या तिरावर व चोडण भागात येणाऱया या अभयारण्यामुळे खारफुटीचे मोठय़ा प्रमाणात संरक्षण झालेले आहे. हे पक्षी अभयारण्य सर्वात उत्पादक आणि जैविकदृष्टय़ा वैविध्यपूर्ण आहे. किनारी भागासाठी महत्वाचे ठिकाण असून, सागरी आणि टेनेस्ट्रियल समुदायांमध्ये बफर म्हणून हे अभयारण्य काम करते. नुकसानकारक वारा, लाटा आणि पूर यांपासून किनारपट्टीचे संरक्षण होण्यात डॉ. सलीम अली पक्ष अभयारण्य महत्त्वाचे ठरलेले आहे.
पणजीपासून जवळच्या अंतरावर असलेले हे अभयारण्य म्हणजे पर्यटकांसाठी वरदान आहे. या ठिकाणी विविध जातीचे पक्षी, जलचर, विविध प्रकारची वनस्पती पाहण्यास वाव आहे. परंतु या ठिकाणच्या सौंदर्यीकरणाकडे विशेष लक्ष न दिल्याने पर्यटक पाठ फिरवत आहेत. जागोजागी बसण्यासाठी घातलेले बाक व बांबूच्या सहाय्याने उभारलेली पायवाटा मोडकळीस आल्याने पर्यटकांना मनमुराद आनंद घेता येत नाही. त्यामुळे सरकारने येथे आवश्यक सोयी-सुविधा पुरवून पर्यटकांना आकर्षित केल्यास पर्यटनदृष्टय़ा विकास होणे शक्य आहे.
राष्ट्रीय पक्षी अभयारण्याचे राज्य म्हणून गोव्याला मान आहे. तरीही सरकारकडून डॉ. सलीम अली अभयारण्यात सोयी-सुविधा पुरविण्याकडे विशेष भर दिला जात नाही. या ठिकाणी आवश्यक सुविधा उपलब्ध झाल्यास पर्यटन क्षेत्राला बळ प्राप्त होईल. राज्यात इफ्फी व इतर मोठे महोत्सव सरकारतर्फे आयोजित केले जातात. त्याच धर्तीवर पक्षी, प्राणी, निसर्गसंपदा यावर आधारीत मोठा कार्यक्रम आयोजित करून डॉ. सलीम अली अभयारण्याचा विकास साधायला हवा. राष्ट्रीय पक्षी अभयारण्य असल्याने सरकारने गांभीर्याने घ्यावे.
– राजेंद्र केरकर, पर्यावरण अभ्यासक
अभयारण्यातील महत्त्वाच्या गोष्टी
- मॅन्ग्रोव्ह इंटरप्रिटेशन सेंटर
- पक्षी, वनस्पती आणि जीवजंतू पाहण्यासाठी पॉईंट
- खारफुटीची रोपवाटिका
- दोन वॉच (टेहळणी) टॉवर
- बॅकवॉटर पक्षी निरीक्षणासाठी बोटिंग
- बाबूच्या सहाय्याने उभारलेल्या दोन पायवाटा









