कोल्हापूर / अहिल्या परकाळे :
शिवाजी विद्यापीठ प्रशासनाने काळानुरूप बदल करीत राज्य, देश नव्हे तर जागतिक पातळीवर संशोधनात विद्यापीठाचे नाव सुवर्णाक्षरांनी कोरले आहे. बदलत्या तंत्रज्ञानाचा वापर करून परीक्षा अर्ज भरण्यापासून ते निकालापर्यंत सर्वच गोष्टी विद्यार्थ्यांना ऑनलाईन दिल्या जातात. त्यात आता भर पडणार ती दीक्षांत समारंभात पदवी प्रमाणपत्र घेण्यासाठी व्हॉटसअॅपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आठवण करून दिली जाणार आहे. पदवी प्रमाणपत्र स्विकारेपर्यंत वारंवार मेसेज केला जाणार आहे. ऐवढेच काय पण जानेवारी 2025 मध्ये होणाऱ्या दीक्षांत समारंभाचे प्रक्षेपणही ऑनलाईन केले जाणार आहे.
विद्यापीठाने नॅक मूल्यांकनात राज्यात अव्वल येण्याचा मान मिळवला. संशोधनाच्या जागतिक क्रमवारीतही आपला ठसा उमटवला आहे. ऐवढेच काय पण देशातील अव्वल क्रमांकाचे संशोधक म्हणून प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील यांची ओळख आहे. दर्जेदार शिक्षण, संशोधनात शिवाजी विद्यापीठाने इतर विद्यापीठांना मागे टाकत, विद्यार्थ्यांभिमुख विद्यापीठ करण्याचा वारंवार प्रयत्न केला आहे. विद्यापीठातील परीक्षेचा निकाल 30 दिवसाच्या आत लावून विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण व नोकरीचा मार्ग रिकामा केला. चॉईस बेसड क्रेडिट सिस्टमच्या माध्यमातून नियमित अभ्यासक्रमाबरोबर इतर अभ्यासक्रमाची पदवी घेण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. त्यानंतर परीक्षेचा अर्ज ऑनलाईन भरून त्याची प्रिंट विद्यापीठात जमा करावी लागत होती. पुन्हा संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन केली. खासगी कंपनीच्या एसआरपीडीच्या माध्यमातून प्रश्नपत्रिका महाविद्यालयांना ऑनलाईन पाठवण्यात आल्या. यात अनेक ठिकाणी गोंधळाचे वातावरण निर्माण झाल्याने विद्यापीठाने स्वत:चे एसआरपीडी अॅप तयार केले आहे. या अॅपच्या माध्यमातून यशस्वीपणे ऑनलाईन प्रश्नपत्रिका पाठवून परीक्षा घेतल्या जात आहेत. विद्यापीठाचा हा प्रयोग यशस्वी झाल्याने सर्वत्र विद्यापीठ प्रशासनाचे कौतुक होत आहे.
विद्यापीठाने प्रवेश, परीक्षा, दीक्षांत अर्ज भरण्यापासून ते पेमेंट गेटवेपर्यंत सर्व सुविधा ऑनलाईन उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे विद्यापीठात येण्याचे कष्ट, पैसा आणि वेळ वाचल्याने या सुविधांचे विद्यार्थी, प्राध्यापकांकडून स्वागत होत आहे. तसेच स्वनिर्मित एसआरपीडीच्या माध्यमातून काही व्यवसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षा ऑनलाईन घेण्यातही विद्यापीठाने यश मिळवले आहे. आता प्रोफेशनल विद्यापीठाप्रमाणे पदवी प्रमाणपत्रासाठी अर्ज भरणे, पदवी प्रमाणपत्र प्रत्यक्ष किंवा पोस्टाच्या माध्यमातून मिळवण्यासाठी ऑनलाईन मेसेजच्या माध्यमातून माहिती दिली जाणार आहे. विद्यार्थी प्रमाणपत्र, गुणपत्रक घेऊन जाईपर्यंत विद्यापीठ विद्यार्थ्यांना आठवणीचा मेसेज पाठवेल. विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ जानेवारी मध्ये होणार आहे. त्यामुळे विद्यापीठातील परीक्षा विभागांतर्गत दीक्षांत समारंभाची तयारी सुरू असून विद्यार्थ्यांना व्हॉटसअॅपव्दारे माहिती दिली जातेय.
तंत्रज्ञानाच्या दुनियेत विद्यापीठ शंभर टक्के ऑनलाईनच्या मार्गावर
तंत्रज्ञानाच्या दुनियेत विद्यापीठ शंभर टक्के ऑनलाईन होण्याचा पुर्णपणे प्रयत्न सुरू आहे. ट्रान्सफर सिटही विद्यार्थ्यांना ऑनलाईन पाठवली जाते. तसेच विद्यार्थ्यांना एक लॉगईन देवून त्यांची सर्व गुणपत्रक, पदवी प्रमाणपत्रही ऑनलाईन उपलब्ध करून दिले जाणार आहे. जेणेकरून विद्यार्थ्यांना कोठेही कागदपत्रे घेवून जाण्याची गरज भासणार नाही. नोकरीसाठीच्या मुलाखतीला किंवा पुढील शिक्षणाला जाताना लॉगईनच्या माध्यमातून संबंधीत संस्थेला कागदपत्रे दाखवता येणार आहेत. अशा प्रकारे विद्यापीठ शंभर टक्के ऑनलाईन करण्याचा प्रयत्न प्रशासनाचा आहे.
विद्यापीठ विद्यार्थीभिमुख करण्याचा प्रयत्न
शिवाजी विद्यापीठ नेहमीच विद्यार्थ्यांच्या हिताची काळजी घेते. विद्यापीठ अधिकाधिक विद्यार्थीभिमुख करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांना दीक्षांत समारंभाची संपूर्ण माहिती व्हॉटसअॅपच्या माध्यमातून दिली जाणार आहे.
डॉ. व्ही. एन. शिंदे (कुलसचिव, शिवाजी विद्यापीठ)








