वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अखिल भारतीय टेनिस संघटनेने आगामी होणाऱ्या मोरोक्कोविरुद्धच्या डेव्हिस लढतीसाठी भारतीय डेव्हिस संघाची घोषणा केली असून त्यामध्ये दिग्विजय प्रतापसिंग या एकमेव नव्या चेहऱ्याचा समावेश आहे. डेव्हिस चषक स्पर्धेतील मोरोक्कोविरुद्धची लढत लखनौमध्ये खेळवली जात आहे. भारत आणि मोरोक्को यांच्यात डेव्हिस चषक विश्व गट 2 मधील ही लढत 16 ते 17 सप्टेंबर रोजी होणार आहे.
या लढतीसाठी अखिल भारतीय टेनिस संघटनेने भारतीय डेव्हिस संघाची घोषणा केली आहे. या संघामध्ये सुमित नागल, शशीकुमार मुकुल, युकी भांब्री, रामकुमार रामनाथन, रोहन बोपण्णा आणि नवोदित दिग्विजय प्रतापसिंग यांचा समावेश केला आहे. घोषित करण्यात आलेल्या भारतीय डेव्हिस संघाला रोहित राजपाल हा बहिस्थ कर्णधार म्हणून लाभला आहे. डेव्हिस चषक स्पर्धेत भारतीय संघ सध्या विश्व गट 2 मध्ये रिलेगेट विभागात असून त्यांना चालू वर्षाच्या प्रारंभी झालेल्या विश्व गट प्लेऑफ लढतीत डेन्मार्ककडून पराभव पत्करावा लागला होता.









