वृत्त फेटाळले : तक्रार करण्याचा इशारा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार दिग्विजय सिंग यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचे वृत्त रविवारी दिवसभर पसरले. वास्तविक, दिग्विजय सिंग यांच्या राजीनाम्याशी संबंधित एक पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. काही वेळातच ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. मात्र, काही वेळाने दिग्विजय यांनीच या वृत्ताचे खंडन केले. या खोडसाळ प्रकारला त्यांनी भाजपला जबाबदार धरले असून आपण त्यासंबंधी पोलिसात तक्रार करण्याचा इशाराही दिला आहे.
दिग्विजय सिंग यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर आपल्या संतापजनक भावना व्यक्त केल्या आहेत. भाजप खोटे बोलण्यात माहिर आहे. मी 1971 मध्ये काँग्रेसचे सदस्यत्व घेतले. मी पक्षात पदासाठी नाही, तर माझ्यावर विचारसरणीचा प्रभाव असल्याने मी पक्षात प्रवेश केला. आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत काँग्रेसमध्येच राहीन. या खोडसाळपणाविरोधात आपण पोलिसात तक्रार दाखल करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.









