ईडब्ल्यूएस आरक्षणाचा मुद्दा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
काँग्रेस खासदार दिग्विजय सिंह यांनी मंगळवारी राज्यसभेत केंद्र सरकारचे कौतुक केले आहे. आरक्षण नसलेल्या समुदायाच्या मुलामुलींना केंद्रीय सेवांमध्ये आरक्षण देण्याचे चांगले काम मोदी सरकारने केले असल्याचे उद्गार दिग्विजय यांनी काढले आहेत. याचबरोबर त्यांनी ईडब्ल्यूएस आरक्षणासाठी लागू करण्यात आलेल्या अटींसंबंधी एक मागणीही देखील केली आहे.
ईडब्ल्यूएस विद्यार्थ्यांकरता वयोमर्यादेत सूट तसेच अन्य अटींमध्ये सूट देण्यात यावी असे दिग्विजय सिंह यांनी म्हटले आहे. अनुसूचित जाती आणि जमातीच्या विद्यार्थ्यांना वयोमर्यादेत 5 वर्षांची सूट मिळते, तर ओबीसी उमेदवारांना 3 वर्षांची सूट प्राप्त आहे, पण ईडब्ल्यूएसच्या उमेदवारांना वयोमर्यादेत सूट मिळत नाही. मोदी सरकारने ईडब्ल्यूएस श्रेणीतही वयोमर्यादेत सूट द्यावी. राजस्थान, गुजरात, हरियाणा, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, तेलंगणा, जम्मू-काश्मीर, मध्यप्रदेशने ईडब्ल्यूएस उमेदवारांसाठी वयोमर्यादेत 5 वर्षांची सूट दिली आहे. राजस्थान आणि गुजरात समवेत काही ठिकाणी उत्पन्नमर्यादाही हटविण्यात आली असल्याचे दिग्विजय सिंह यांनी म्हटले आहे.









