पत्र लिहित असल्याचा केला होता आविर्भाव, सामनाधिकाऱ्यांकडून दंड
प्रतिनिधी/ लखनौ
पंजाब किंग्सचा फलंदाज प्रियांश आर्यला बाद केल्यानंतर लखनौ सुपर जायंट्सचा फिरकीपटू दिग्वेश सिंह राठीने पत्र लिहित असल्याचा आविर्भाव करून ज्या प्रकारे आनंद साजरा केला ते त्याला महागात पडले आहे. त्याला त्याच्या सामन्याच्या मानधनाच्या 25 टक्के दंड आकारण्यात आला आहे आणि डिमेरिट पॉइंट देण्यात आला आहे.
मंगळवारी लखनौमधील एकाना स्टेडियमवर पंजाब किंग्सविऊद्ध एलएसजीच्या सामन्यादरम्यान आयपीएल आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने राठीला दंड ठोठावला आहे. पंजाबने हा सामना आठ गड्यांनी जिंकला. दिग्वेश सिंहने कलम 2.5 च्या अंतर्गत हा प्रथम श्रेणीचा गुन्हा मान्य केला आहे आणि सामनाधिकाऱ्यांनी दिलेली शिक्षा स्वीकारली आहे, असे आयपीएलच्या निवेदनात म्हटले आहे.
प्रथम श्रेणी आचारसंहितेच्या उल्लंघनाच्या बाबतीत सामनाधिकाऱ्यांचा निर्णय अंतिम आणि बंधनकारक असतो. पंजाब 172 धावांचा पाठलाग करत असताना तिसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर हा प्रकार घडला होता. दिग्वेशने यावेळी एक आखूड आणि बराच बाहेर चेंडू टाकला होता, जो आर्यने पाय जास्त न हलवता फटकावण्याचा प्रयत्न केला होता. परंतु चेंडू वर उडून शार्दुल ठाकूरने मिडऑनवरून धाव घेऊन धावत धावत झेल घेतला होता. नऊ चेंडूंत आठ धावा काढून आर्य पॅव्हेलियनमध्ये परत येत असताना दिल्ली ‘टी-20 लीग’मधील त्याचा सहकारी दिग्वेशने पत्र लिहिण्याचा आविर्भाव केला होता. सदर कृत्य हे आर्यला संबेधून असल्याचे दिसून आले होते. पंचांनी हा हावभाव लक्षात घेऊन नंतर त्याच्याशी संवाद साधला होता.









