वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशाचे माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांची सहावी पुण्यतिथी शुक्रवारी होती. 16 ऑगस्ट 2018 रोजी वयाच्या 83 व्या वषी त्यांचे निधन झाले. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त समाधीस्थळी श्र्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते. रालोआ आघाडीचे सदस्य आणि भारतीय जनता पक्षाचे नेते राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा, जे. पी. नड्डा, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, मनोहरलाल खट्टर यांनीही दिल्लीतील स्मृतीस्थळी झालेल्या श्रद्धांजली सभेला हजेरी लावली. वाजपेयीजी यांनी पंतप्रधान म्हणून देशाला धोरणात्मक आणि आर्थिकदृष्ट्या मजबूत केले. देशात जेव्हा जेव्हा राजकीय शुद्धता, राष्ट्रहितावरील निष्ठा आणि तत्त्वांप्रती स्थिरता यावर चर्चा होते तेव्हा अटलजींची आठवण येते, असे प्रतिपादन गृहमंत्री अमित शहा यांनी केले. आपल्या देशाच्या सुरक्षा आणि आर्थिक आधुनिकीकरणासाठी त्यांनी दिलेले आयुष्यभराचे योगदान कायम स्मरणात राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले









