कोल्हापूर :
कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीवरुन शहर आणि ग्रामीण भागात संघर्ष सुरु आहे. हा संघर्ष आता डिजिटल फलकांवर उतरला आहे. शहरात हद्दवाढीच्या समर्थनार्थ तर ग्रामीण भागामध्ये हद्दवाढीच्या विरोधात भव्य डिजिटल फलक उभारुन नागरिक आपल्या भावना व्यक्त करत आहेत.
कोल्हापूर शहराची हद्दवाढ गेल्या 52 वर्षापासून रखडली आहे. महापालिकेच्या स्थापनेपासून 1 इंचही शहराची हद्दवाढ झाली नसल्याने शहराचा विकास खुंटला आहे. यामुळे गेल्या काही वर्षापासून हद्दवाढीची मागणी जोर धरत आहे. मात्र या ना त्या कारणाने शहराची हद्दवाढ रखडली आहे. हद्दवाढीमध्ये 18 गावे आणि 2 एमआयडीसींचा समावेश करावा अशी मागणी जोर धरत आहे. मात्र याला ग्रामीण भागाने तीव्र विरोध दर्शविला आहे. शहरातील नागरिकांना आधी सुविधा द्या मगच हद्दवाढीची भाषा करा अशा आशयात विरोध करत हद्दवाढीला विरोध केला आहे. हद्दवाढ कृती समिती आणि ग्रामीण भागातील हद्दवाढ विरोधी कृती समिती आपआपल्या मागण्यांवर ठाम असून, आगामी काळात या प्रश्नावरुन पुन्हा संघर्ष होण्याची चिन्हे आहेत. याची ठिणगी डिजिटल फलकांच्या माध्यमांतून पडली आहे. शहरात हद्दवाढीच्या समर्थनार्थ 100 भव्य डिजीटल फलक उभारण्याचे नियोजन शहर हद्दवाढ कृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे. तर याला विरोध म्हणून ग्रामीण भागातही हद्दवाढ का नको याचे फलक उभारण्यात आले आहेत.

- कोल्हापूर शहराची हद्दवाढ होणार म्हणजे होणारच
काय राव जनतेला सोडून राहता आमच्या शहरात के. एम. टी. आमची … पाणी आमचं…दवाखाना आमचा… शाळा कॉलेज आमचं…
आणी मापं बी आमचींच काढता व्हय राव ? हे काय बर नाय राव … अशा आशयाचे फलक उभारण्यात आले आहेत.
- पोरगं राहिल उपाशी पावण्याला आवतण तुपाशी
कोल्हापूर शहराच्या बकाल पणाला जबाबदार कोण…, विरोध करणार, विरोध करणार शहराच्या हद्दवाढीला विरोधच करणार, शहरातील नागरिकांना चांगले रस्ते का नाहीत, पाणीपुरवठा पुरेसा का नाही, रस्त्यावरील अनियंत्रित पार्किंग व अतिक्रमणाला कोण जबाबदार, केएमटी मोडकळीस आली, 100 टक्के घरफाळा का जमा होत नाही, आधी शहरातील नागरिकांना मूलभुत सुविधा द्या आणि नंतर हद्दवाढीच्या फुशारक्या मारा अशा आशयाचे फलक ग्रामीण भागात उभारण्यात आले आहेत.








