पुणे / प्रतिनिधी :
कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे कौशल्य आणि शिक्षण क्षेत्रात मोठी क्षमता निर्माण झाली आहे. सध्याचे डिजिटल तंत्रज्ञान हे तोल सांभाळण्याचे काम करते आणि सर्वसमावेशकतेला प्रोत्साहन देते. डिजिटल तंत्रज्ञान ही शिक्षणात प्रवेश सुलभ करणारी आणि भविष्यातील गरजांचा स्वीकार करणारी कित्येक पट मोठी शक्ती असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
पुण्यात सुरू असलेल्या जी-20 शिक्षणमंत्र्यांच्या बैठकीला गुरूवारी पंतप्रधान मोदी यांनी ध्वनीचित्रफितीच्या माध्यमातून संबोधित केले. यानंतर जी-20 परिषदेची सांगता झाली. पुढील जी-20 बैठक ब्राझील या देशात होणार असल्याची घोषणादेखील या वेळी करण्यात आली. याप्रसंगी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यासह जी-20 देशांचे शिक्षणमंत्री व अधिकारी उपस्थित होते.
पंतप्रधान मोदी म्हणाले, आपल्या संस्कृतीचा पाया हा शिक्षणावर उभा राहिला आहे. मात्र, त्यापलीकडेही शिक्षण आपल्या मानवतेच्या भविष्याला आकारही देत आहे. खरे ज्ञान आपल्याला विनम्रता शिकवते आणि विनम्रतेतून आपले मूल्य वाढते आणि त्यातून आपल्याकडे संपत्ती निर्माण होते. संपत्तीतून आपण सत्कर्म करू शकतो आणि हेच आपल्या आयुष्यात आनंद आणणारे आहे. आपल्या युवाशक्तीला भविष्यासाठी सज्ज करत असताना आपल्याला सातत्याने कौशल्ये शिकणे, पुनर्कौशल्ये आणि कौशल्ये अद्ययावत करत राहावी लागतील.
कौशल्य मॅपिंक कार्यक्रम हाती घेणार
सरकार कौशल्य मॅपिंग कार्यक्रम हाती घेत आहे. शिक्षण, कौशल्य आणि कामगार मंत्रालये या उपक्रमावर एकत्रितपणे काम करत आहेत. जी-20 देश जागतिक स्तरावर कौशल्य मॅपिंग करू शकतात आणि त्या कमतरता शोधू शकतात, ज्या दूर करण्याची गरज आहे, अशी सूचनाही त्यांनी केली. जी-20 शिक्षणमंत्र्यांच्या गटाने शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्यासाठी हरित संक्रमण, डिजिटल परिवर्तन आणि महिला सक्षमीकरण यांना चालना दिली आहे. शिक्षण हे या सर्व प्रयत्नांचे मुळ आहे. सर्वसमावेशक, कृती-केंद्रित आणि भविष्यासाठी सज्ज शिक्षणाचा अजेंडा ही बैठकीची फलनिष्पत्ती असेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
पुढील परिषद ब्राझीलमध्ये
जी 20 शिक्षणमंत्र्यांच्या बैठकीत सहभागी झालेल्या निवडक देशांच्या शिक्षणमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पुण्यातील दोन दिवसांच्या परिषदेत खूप काही शिकता आले. पुण्याची संस्कृती, आदरातिथ्य पाहून आनंद झाला. खासकरून जेवण रूचकर आणि मसालेदार होते, असा अनुभव या शिक्षणमंत्र्यांनी मांडला. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले, पुढील जी 20 परिषद ब्राझील या देशात होणार आहे. पुण्यातील चौथ्या जी 20 शिक्षण परिषदेत अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा झाली. परिषद यशस्वीरीत्या पार पडल्याचे सांगून सर्व आयोजकांचे त्यांनी आभार मानले. तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील शैक्षणिक प्रदर्शनाला विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद दिल्याचे त्यांनी नमूद केले.








