सरकारी जागेवर अतिक्रमण करणाऱ्यांचे धाबे दणाणले : जागेवर अनेक इमारती उभारल्याने सर्वेक्षण कामात अडथळे
खानापूर : येथील खानापूर-हल्याळ महामार्गालगत असलेल्या सर्व्हे क्रमांक 49 या सरकारी तळ्यावर अतिक्रमण केल्याची तक्रार यशवंत बिरजे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. या तक्रारीची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी या जागेचा सर्व्हे करून अहवाल देण्याचा आदेश खानापूरचे तहसीलदार प्रकाश गायकवाड यांना दिला होता. त्यानुसार बुधवारी महसूल अधिकारी, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी, पोलीस अधिकारी यांच्या उपस्थितीत सर्व्हे करण्यात आला. मात्र या जागेवर अनेक इमारती उभारण्यात आल्याने सर्व्हे करण्यास अडथळे निर्माण झाल्याने पुन्हा या जागेचा डिजिटल सर्व्हे करण्यासाठी वरिष्ठांकडे अहवाल पाठवून मागणी करण्यात येणार असल्याचे यावेळी अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
सर्व्हे क्रमांक 49 या सरकारी तळ्यावर काही वर्षापूर्वी अतिक्रमण करून या जागेचा वापर करण्यात येत आहे. तसेच या जागेत प्लॉट पाडवून विक्रीही करण्यात आली आहे. प्लॉट खरेदीधारकांनी या जागेवर इमारतीही उभारल्या आहेत. याबाबत येथील सामाजिक कार्यकर्ते यशवंत बिर्जे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सर्व कागदपत्रासह अर्ज करून या जागेचा सर्व्हे करण्यात यावा आणि सरकारची जागा सरकारने ताब्यात घ्यावी, अशी मागणी जनता दर्शन कार्यक्रमात केली होती. याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी खानापूरचे तहसीलदार प्रकाश गायकवाड यांना या जागेचा सर्व्हे करून अहवाल देण्यात यावा, अशा सूचना केल्या होत्या. त्यानुसार तहसीलदार प्रकाश गायकवाड यांनी सर्वेक्षण विभागाला या जागेचा सर्व्हे करण्याची नोटीस बजावली होती. त्यानुसार सर्वेक्षण अधिकाऱ्यांनी बुधवार दि. 24 रोजी सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचे यापूर्वी नोटिसीद्वारे जाहीर केले होते. त्यानुसार आज सकाळी 11 वाजता खानापूरचे महसूल अधिकारी काशीनाथ टक्केकर, नगरपंचायतीचे महसूल अधिकारी कांबळे, पोलीस अधिकारी खोत यांच्या उपस्थितीत सर्वेक्षण विभागाचे विनोद संबाणी यांनी सर्वेक्षण केले. मात्र या जागेवर अनेक इमारती उभारल्याने सर्वेक्षण कामात अडथळे निर्माण झाले होते. पुन्हा डिजिटल सर्वे करण्याचा प्रस्ताव पाठवण्यात येणार असल्याचे यावेळी विनोद संबाणी यांनी सांगितले.
सर्वेक्षणवेळी शहरातील अनेकांनी गर्दी केली होती. सर्वेक्षणामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत. ज्यांनी मोठी रक्कम देवून जमीन खरेदी घर बांधलेले आहे. त्यांचे तोंडचे पाणी पळाले आहे. सर्वेक्षणावेळी यशवंत बिरजे यांच्यासह मुरलीधर पाटील, रेवणसिद्धय्या हिरेमठ, बाळासाहेब देवलत्तकर, विनायक मुतगेकर, दिनकर मरगाळे, विनायक पाटील, अमृत पाटील, आबासाहेब दळवी, संजय पाटील, डॉ. पी. एच. पाटील, गुंडू खांबले, विजय गुरव उपस्थित होते.
शेवटपर्यंत अतिक्रमणाविरोधात लढा देणार
तक्रारदार यशवंत बिरजे तरुण भारतशी बोलताना म्हणाले, शहरातील अनेक सरकारी जागांवर अतिक्रमण करून जागा हडप केल्या आहेत. याबाबत सर्व कागदपत्र पुराव्यासह न्यायालयात तसेच सरकार दरबारी दाद मागण्यात येणार असून सरकारी जागेवर झालेले अतिक्रमण हटवून या जागा खानापूरकरांच्या वापरासाठी खुल्या करून देण्याचा प्रयत्न आहे. माझ्यावर कोणतेही आरोप झाले तरी मी यातून माघार घेणार नसून मी शेवटपर्यंत प्रामाणिकपणे अतिक्रमणाविरोधात लढा देणार असून न्यायालयातही इतर जागेबाबत मी दाद मागितली आहे. काही लोकानी अधिकाऱ्यांना हाताशी धरून सरकारी जमिनी हडप केल्या आहेत. त्या जमिनी परत सरकार जमा करून खानापुरातील सामान्य जनतेच्या वापरासाठी खुल्या करण्याचा मानस आहे.









