मोबाईल अॅप्लिकेशन ठरतेय अनुकूल : लाखो नागरिकांना लाभ
बेळगाव : नागरिकांना जलद सेवा, पारदर्शक व सुलभ सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने कर्नाटक सरकारने 2023 च्या सप्टेंबरमध्ये ‘कर्नाटक वन’ मोबाईल अॅपद्वारे डिजिटल सेवा देण्यात यशस्वी झाले आहे. हा अॅप नागरी सेवांचे इलेक्ट्रॉनिक वितरण निर्देशनालयाने (इडीसीएस) विकसित केला आहे. अॅप व्यवहारात आल्यानंतर सरकारी कार्यालयांना नागरिकांनी हेलपाटे घालण्याचे काम कमी झाले आहे.
नागरिक एकाच मोबाईल अॅप्लिकेशनद्वारे सेवा उपलब्ध करून घेऊ शकतात. 1.43 लाखाहून अधिकजण अॅप्लिकेशनद्वारे विविध सेवा मिळवित आहेत. या अॅप्लिकेशनद्वारे विजेचे बिल, पाण्याचे बिल, प्राप्तिकर, वाहतूक दंडाची रक्कम, आरसी सेवा, एसएसएलसी पीयुसीसाठी लागणारा स्थलांतराचा दाखला, उत्तरपत्रिका फेरतपासणी यासारख्या सेवा उपलब्ध होऊ शकतात. अलिकडेच प्राथमिक-माध्यमिक शिक्षण मंत्र्यांनी एसएसएलसी उत्तरपत्रिका फोटो कॉपी व फेरमूल्यमापन सेवा या
अॅप्लिकेशनमध्ये उपलब्ध करून दिल्या आहेत. या सुविधेचा 50 हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी लाभ घेतला आहे. आता लवकरच बारावी फोटो कॉपी व फेरमूल्यमापन सेवा, केएसआरटीसी ऑनलॉईन तिकीट बुकिंग, ओसीटी फायबर बिल भरणे व डिजिटल डॉक्युमेंट एक्झीक्युशन यासारख्या सेवा उपलब्ध होणार आहेत. अॅप्लिकेशनमध्ये क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग, यूपीआय यासह अन्य काही सुविधा सुलभपणे मिळत आहेत. ग्रामीण तसेच शहरातील नागरिकही याचा लाभ घेत आहेत.









