केंद्र सरकारने सुरू केले पोर्टल
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिनानिमित्त राजधानीमध्ये आयोजित केल्या जाणाऱया कार्यक्रमांचा आस्वाद घेण्यासाठी देण्यात येणारे पास आता डिजिटल (ऑनलाईन) स्वरुपात उपलब्ध करून दिले जाणार आहेत. केंद्र सरकारने एक पोर्टल जारी करत यासंबंधी मोठा निर्णय घेतला आहे. संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांनी शुक्रवारी या सुविधेसाठी ऑनलाईन पोर्टल सुरू केले. या पोर्टलचे नाव www.aamantran.mod.gov.in असे ठेवण्यात आले आहे. आता या नव्या प्रणालीद्वारे डिजिटल पास वितरित केले जाणार असल्याने लोकांना तिकिटांसाठी रांगेत उभे राहावे लागणार नाही.
नव्याने सुरू करण्यात आलेल्या पोर्टलवरून व्हीआयपी, पाहुणे आणि सामान्य लोकांना तिकीट खरेदी करण्याची संधी मिळेल. ऑनलाईन उपलब्ध तिकिटे शहर किंवा जिल्हय़ांनुसार उपलब्ध होणार नाहीत. या पोर्टलवरून तिकीट आणि पासची संपूर्ण प्रक्रिया सुलभ करण्यात आली आहे.









