नागरिकांची हेस्कॉमकडे तक्रार
बेळगाव : हेस्कॉमने काही वर्षांपूर्वी शहरामध्ये डिजिटल वीज मीटर बसविले होते. परंतु या वीज मीटरमध्ये मोठ्या प्रमाणात वीजदुरुस्ती करावी लागत आहे. सदोष असलेल्या मीटरची संख्या वाढल्यामुळे चुकीचे रिडींग तसेच रिडींग जंप होणे, रिडींग झिरो दाखवणे असे प्रकार घडत आहेत. त्यामुळे हेस्कॉमने यातून मार्ग काढावा, अशी मागणी नागरिकांकडून शनिवारी आयोजित बैठकीत करण्यात आली. हेस्कॉमच्या विभागीय कार्यालयामध्ये झालेल्या बैठकीत नागरिकांनी समस्या मांडल्या. शहर उपविभाग-1 येथे झालेल्या बैठकीला कार्यकारी अभियंता मनोहर सुतार उपस्थित होते. या बैठकीमध्ये वाढीव वीजबील, चुकीचे रिडींग यासह इतर समस्या मांडण्यात आल्या. सध्या गणेशोत्सवाची तयारी सुरू असल्याने काही मंडळांच्या सदस्यांनी वीज वाहिन्यांची उंची वाढविण्याची मागणी केली. तसेच इतर घरगुती कनेक्शनच्या समस्या अधिकाऱ्यांसमोर मांडल्या. नागरिकांच्या समस्या लवकर सोडविल्या जातील, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. यावेळी साहाय्यक कार्यकारी अभियंता अश्विन शिंदे यांच्यासह इतर उपस्थित होते.









