बेळगाव : मिटर रिडिंगच्या समस्या संपविण्यासाठी हेस्कॉमकडून नवे डिजिटल मीटर बसविले जात आहेत. शहराच्या उत्तर व दक्षिण विभागात एकूण 1 लाख 10 हजार पेक्षा अधिक विद्युत मीटर बसविले जाणार आहेत. यामुळे प्रति महिन्याला बरोबर तारखेलाच मीटर रिडींग केले जाणार आहे. यामुळे ग्राहक आणि हेस्कॉम कर्मचाऱ्यांमधील वादावादीचे प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे. मीटर रिडींग करताना जुन्या मीटरमध्ये अनेक समस्या येत होत्या. तसेच शहराच्या काही भागामध्ये अद्यापही जुने लोखंडी मीटर सुरूच होते. त्यामुळे हेस्कॉमने डिजिटल मीटर बसविण्याच्या कामाला सुरूवात केली आहे. हेस्कॉमकडून पूर्णपणे मोफत विद्युत मीटर बसविले जात आहे. परंतु विद्युत मीटर बसविण्याचे कंत्राट घेतलेले कर्मचारी काही ठिकाणी पैसे मागत असल्याची घटना समोर आली होती. परंतु कोणालाही पैसे देवू नयेत, असे आवाहन हेस्कॉमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केले आहे.
ग्राहकांमध्ये संभ्रमाचे वातावरण
हेस्कॉमकडून विद्युत मीटर बसविण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली. परंतु हेस्कॉमने कोणत्याही स्थानिक वृत्तपत्र, अथवा वाहिन्यांवर याची माहिती दिली नाही. त्यामुळे विद्युत मीटर कशासाठी बदलला जात आहे? याची माहिती ग्राहकांना नाही. त्यामुळे काही ग्राहकांनी मीटर बसविण्यास आलेल्या कामगारांना माघारी धाडले. कामगारांकडे मीटर बसविण्यासाठीची ऑर्डर कॉपी नसल्याने ग्राहक व कामगारांमध्ये वादावादीचे प्रकारही घडले. हेस्कॉमच्या या चुकीमुळे ग्राहकांना मात्र मनस्ताप सहन करावा लागला.
कामगारांसोबत कायमस्वरुपी कर्मचारी-ए. एम. शिंदे, साहाय्यक कार्यकारी अभियंता
हेस्कॉमने शहरात डिजिटल विद्युत मीटर बसविण्याच्या कामाला सुरूवात केली आहे. ज्या ज्या ठिकाणी विद्युत मीटर बसविले जात आहेत. त्या ठिकाणी हेस्कॉमचे कायमस्वरुपी कर्मचारी कामगारांसोबत पाठविले जात आहेत.









