सातारा / विशाल कदम :
सातारा नगरपालिकेचे ‘माय सातारा’ हे अॅप आहे. त्या अॅपवरच पालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांची आता डिजिटल हजेरी सुरु करण्यात आली आहे. त्या डिजिटल हजेरीची सुरुवात मंगळवारपासून करण्यात आली आहे. डिजिटल हजेरीबरोबरच कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामांचीही माहिती त्या अॅपवर घेतली जात आहे. त्यामुळे आता कोणत्या प्रभागात गटर स्वच्छ झाले नाही, कर्मचारी आलेच नाहीत, असे म्हणण्यास वाव मिळणार नाही. प्रत्येक मुकादमांचे मोबाईल नंबर त्या अॅपला रजिस्टर केले आहेत. त्यांना हजेरी घेण्यासाठीही सुविधा दिलेली आहे.
सातारा पालिकेचे आरोग्य कर्मचारी हे शहरातील स्वच्छतेचे काम करून शहरात रोगराई निर्माण होऊ नये, यासाठी प्रयत्न करत असतात. दररोज शहराची स्वच्छता ठेवत असतात. त्यामध्ये अनेकदा सातारा पालिकेवर नागरिक आरोप करत असतात की आमच्या भागात झाडू मारणारे कामगार आलेच नाहीत. आमच्या इथे गटर स्वच्छ केले नाही. आमच्या येथे धूर फवारणी केलेली नाही.
त्यामुळे आरोग्य विभाग हा बदनाम होत असतो. आता मात्र यास पूर्णविराम मिळणार असून सातारा पालिकेच्यावतीने विकसित करण्यात आलेले ‘माय सातारा’ हे अॅप आहे. त्या अॅपवर आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी डिजिटल हजेरीची संकल्पना पुढे आणली गेली आहे. त्याकरता ‘माय सातारा’ या अॅपवर आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी लॉग इन खोलले आहे. त्याकरता सफाई मित्र हे वेगळे ऑप्शन तयार करण्यात आले असून त्याचे लॉग इन हे त्या त्या प्रभागातील मुकादमांकरता दिले गेले आहे. त्यांचे मोबाईल नंबर रजिस्टर केलेले असून डिजिटल हजेरी घेत असताना सकाळी त्या प्रभागात काम सुरु करण्यापूर्वी अगोदरचा फोटो लाईव्ह लोकेशनचा घेऊन अॅप उघडून त्यामध्ये अटेंडन्समध्ये जाऊन प्रभाग क्रमांक, कर्मचाऱ्यांची नावे अन् तो फोटो अपलोड केला जात आहे. त्यानंतर केलेल्या कामाचा फोटो व्हिडीओ माहिती भरली जात आहे. त्यात गटर काम असेल तर गटर काम, धूर फवारणी असेल तर धूर फवारणी नमूद करुन त्याचे कामाआधीचे फोटो, व्हिडीओ व कामानंतरचे फोटो व्हिडिओ अपलोड केले जात आहे.
या हजेरीची माहिती भरल्यानंतर ती अॅपवर मुख्याधिकारी अभिजित बापट, उपमुख्याधिकारी अरविंद दामले, आस्थापना शाखेसह आरोग्य विभागातील प्रमुख प्रकाश राठोड, आरोग्य निरीक्षक सागर बडेकर, प्रशांत गंजीवाले, राकेश गालियल यांना दिसणार आहे. डिजिटल हजेरीमुळे कामगार नेमके कामावर होते काय, त्यांनी केलेल्या कामाची नोंदही डिजिटल स्वरुपात राहणार आहे.
- मुकादमाच्या खिशाला कॅमेराही देण्यात येणार
आरोग्य विभागात सुसूत्रता आणण्यासाठी जेवढे सातारा पालिकेचे मुकादम आहेत. त्या सर्व मुकादमांना कामगार काम करत आहेत की नाही, काम चांगल्या दर्जाचे होत आहे की नाही, याची खात्री करण्यासाठी सातारा पालिकेच्यावतीने छोटे पेन टाईप कॅमेरे देण्यात येणार असल्याचे समजते. त्याचबरोबर माय अॅपचा लॉगिन हा ठेकेदारांनाही दिला गेला आहे. त्यांनीही त्यांच्याकडे असलेल्या कामाची नोंद भरणे आवश्यक आहे.








